अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) बंडखोर, अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं बिनशर्त पाठिंबा दिलाय. प्रीती बंड यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) रात्री बडनेरा येथील आठवडी बाजार मैदानावर जाहीर सभा घेतली.
बच्चू कडू सभेत संबोधित करत म्हणाले, "भाजपा किंवा काँग्रेस हे केवळ जनतेच्या डोक्यात जाती-धर्माचं भूत टाकण्याचा प्रयत्न करेल. या देशात जेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान आणि अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते. त्यावेळी हिंदू अडचणीत नव्हता. खरंतर 'हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है' भाषा राजकारणी लोकांची आहेत. वास्तवात आज नेताच खतरे मे आगया", असं बच्चू कडू म्हणाले.
मोठा पुतळा नको आंबेडकरांचे विचार डोक्यात हवेत : "बडनेरा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणारे रवी राणा हे नेहमीच संविधानाचा 'उदो उदो' करतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी आरक्षित केलेले सायन्सकोर मैदान त्यांनी बळकावलं. हा प्रकार संविधानाला महत्व देणारा नाही. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा उभा करण्यात काही अर्थ नाही. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे डोक्यात हवेत", असं देखील बच्चू कडू म्हणाले.
त्या हिंदू शेरनी तर प्रीती बंड शेतकऱ्यांच्या वाघीण : पुढं ते म्हणाले, "आत्ता जाहीर सभेच्या ठिकाणी मशिदीत अजान सुरू असल्यामुळं काही काळ भाषण थांबवण्यात आलं. सारं काही शांत होतं. खरंतर थोड्यावेळ आधी बाजूला मंदिरात आरती सुरू असतानादेखील भाषणं थांबवण्यात आलतं. मात्र, अजान सुरू असल्यामुळं भाषण थांबवलं यावरुन या भागातील हिंदू शेरनी आक्षेप घेऊ शकतात. त्या हिंदू शेरनी असतील तर आमच्या प्रीती बंड या शेतकरी आणि शेतमजुरांच्या वाघीण आहेत, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं", अशा शब्दात बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना चिमटा काढला. तसंच भाजपा असो किंवा काँग्रेस या कुठल्याही पक्षांच्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विचार झाला नाही. यापुढं मात्र असं होणार नाही. कारण आता आमच्याशिवाय कोणाचंही सरकार बनणं अशक्य आहे, असंही ते म्हणाले.
आता दोन दिवस जागृत रहा : "बडनेरा विधानसभा मतदारसंघात आम्हाला परिवर्तन घडताना दिसतंय. असं असलं तरी कोणीही गाफील राहू नये. आज प्रीती बंड यांच्या विजयासाठी घेतलेला ठाम निर्णय आपल्या नातेवाईकांनादेखील घरी जाऊन सांगा. आता दोन दिवस जागृत राहा. विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तिकडं तुषार भारतीय हे अपक्ष उमेदवार राणांना पाडण्यासाठी तयार आहेत. या मतदारसंघात अपक्षांचाच बोलबाला आहेत. आता प्रीती बंड याच विजयी होतील. आपण सारे आपल्या आजच्या निर्णयावर ठाम राहा", असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं.
ऑटो रिक्षा घेऊन मुंबईत जाऊ : पुढं शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावत ते म्हणाले, "खरंतर या निवडणुकीत शिवसेनेची (उबाठा) मशाल आमच्या हातात नाही, हे बरं झालं. मशाल त्यांना पेटवणारी नव्हतीच. आपला ऑटोरिक्षा त्यांना धडक देऊ शकतो. प्रीती बंड यांचं बोधचिन्ह ऑटोरिक्षा आहे. या निवडणुकीत आमच्या बहिणीचा विजय हा निश्चित आहे. त्यांच्या विजयानंतर अमरावतीपासून मुंबईपर्यंत आपण सारे ऑटो रिक्षातून जाऊ. अमरावतीवरुन मुंबईला ऑटोरिक्षानं जाण्याचा नवा विक्रम आपण नोंदवू."
हेही वाचा -