मुंबई – राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मतदारसंघांतील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग सध्या उमेदवारांमध्ये आहे. आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उमेदवारांना त्यांचा जाहीर प्रचार करता येणार नाही. मागील काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंड होतील.
ऐन दिवाळीच्या दिवसात निवडणुका आल्याने सुरुवातीचे काही दिवस प्रचार फेऱ्या, सभा हे काहीस शांत वातावरण होतं. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना चार नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, पाच नोव्हेंबरनंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. सणासुदीच्या धावपळीतून निवांत झालेले नेते चौकसभा, घरोघरी जाऊन प्रचार करणं अशी सर्व कामं करताना दिसले. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यासह सर्वच पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढताना दिसून आले. इतकंच नाहीतर इतर राज्यातील नेतेमंडळी, मुख्यमंत्रीदेखील या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील झालेली पाहायला मिळाली. या सर्व प्रचार आणि रोडशोमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं.
- मुंबईत प्रमुख दोन लढती मानल्या जातात. त्यातील एक म्हणजे माहीम विधानसभेतील आणि दुसरी म्हणजे वरळी विधानसभेतील निवडणूक आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात थेट ठाकरे घरातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं लक्षवेधी ठरत आहेत.
मुंबईत कोणते नेते प्रचारात होणार सहभागी - प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी नेतेमंडळींनी सभांना पसंती न देता बाईक रॅली आणि पत्रकार परिषदा यांना पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची वसई येथे सभा होणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. तर, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेत बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सकाळी विविध उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारांच्या प्रचारात बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी सहानंतर प्रचार करण्याला बंदी - आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेपर्यंत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करता येणार नाही. टीव्ही, केबल, रेडिओ, सोशल मीडिया, प्रसिद्धीपत्रक अशा कोणत्याही माध्यमातून मतदारांवर प्रभाव पडेल अशा कोणत्याही बाबी उमेदवारांना प्रसिद्ध करता येणार नाहीत. सोबतच राजकीय जाहिराती, छोटेखानी कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका यामधूनदेखील प्रचार करण्यास बंदी असणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची मदार मागील काही दिवसात केलेल्या प्रचारावर अवलंबून असणार आहे.
हेही वाचा-