महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय वादंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने - राष्ट्रवादी काँग्रेस

Ajit Pawar on Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत एका कार्यक्रामात शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केल्यानं राजकारण चांगलंच तापलंय. यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ajit Pawar on Sharad Pawar
Ajit Pawar on Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 5:18 PM IST

अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय वादंग

मुंबई Ajit Pawar on Sharad Pawar :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथं एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांचं नाव न घेता वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. अजित पवारांच्या टीकेला शरद पवार गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येतंय. यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात वादाची ठिणगी पडलीय.


काय म्हणाले होते अजित पवार : रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत आपली शेवटची निवडणूक असल्याचं म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील, शेवटची निवडणूक कधी आहे माहीत नाही, असं म्हणत शरद पवार यांचं नाव न घेता शरद पवार गटाला डिवचलं होतं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचं विधान चीड आणणारं असून आपल्या काकाच्या मृत्यूची वाट पाहणं राजकारण आहे का? असा सवाल उपस्थितीत केलाय. तर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना तेलघाले आव्हाड तुम्ही गप्प बसा असा टोला लगावला आहे. 'दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड लोकांना सहज कळतात', असंही रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन आव्हाड यांना सल्ला दिलाय.


शरद पवार विचार आहे : "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमांमध्ये शरद पवारांसंदर्भात काही विधान केलंय. अजित पवारांनी बोलताना तारतम्य पाळायला हवं होतं. इतका कृतघ्नपणा योग्य नाही. शरद पवार कधीही रिटायर न होणारं व्यक्तिमत्त्व आहे." शरद पवार विचार असून व्यक्ती नसल्याचा टोला, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवारांना लगावलाय. बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी तयार केलेला मतदार संघ आहे. त्यांच्या विचारला मारणारा मतदारसंघ आहे. अनेक वेळा तेथील खासदार सुप्रिया सुळे संसदरत्न ठरलेल्या आहेत. मात्र भाजपाचा कोणताही खासदार संसदरत्न ठरलेला नसल्याचं अजित पवारांनी लक्षात घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. अजित पवारांनी केलेली विधानं निंदनीय आणि संतापजनक आहेत. ज्यांनी राजकारणात आपल्याला मोठं केलं त्यांच्याविषयी अशा पद्धतीचं विधान करणं हे जनतेला मान्य नसणार, असंही लवांडे म्हणाले.




राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रयत्न - सुरज चव्हाण : सक्रिय निवडणुकीत भाग घेणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक असेल, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ घेत अजित पवार यांनी दाखला दिला. मात्र, एखाद्या गोष्टीचा विपर्यास करुन राजकीय फायदा कसा मिळवता येईल, असा प्रयत्न करणारे ठाण्याचे राखी सावंत अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा टोला अजीत पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी लगावलाय.


आव्हाड शब्दच्छल करतायत : वयाचा विचार करता ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आपली तब्येत आणि वय हा मतदारांसाठी भावनिक मुद्दा नसावा अशी अपेक्षा अजित पवार यांची असावी. ज्येष्ठ नेत्यांच्या वयाच्या काळजीपोटी ते बोलले त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड शब्दच्छल करत असून त्यांची खोड संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असल्या कारणानं त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी व्यक्त केलाय.



वर्चस्वाची लढाई - आनंद गायकवाड : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालीय. मात्र अजित पवारांनी शरद पवारांबद्दल काल केलेल्या टोकाच्या विधानामुळं दोघांत अंतर्गत दुफळी पडली किंवा वैचारिक मतभेद झालेले आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सातत्यानं त्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीकडे आणि वयाकडे बोट निर्देश करत होते. याचाच अर्थ असा होता की, अजित पवारांना पक्षाचं नेतृत्व करायचं होतं. शरद पवारांचा वय झालय, त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली पहिजे असं मत अजित पवार यांच मत असावं असं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. "काकांच्या मृत्यूची वाट बघताय", अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
  2. पूनम पांडेच्या थापेला 'दादा'ही पडले बळी; महिलांना दिला 'हा' सल्ला
  3. 'पार्थ पवार गजानन मारणे भेट चुकीची, पार्थची भेट झाल्यावर समजावून सांगेन': अजित पवारांनी टोचले कान

ABOUT THE AUTHOR

...view details