मुंबई Lok Sabha election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात होणाऱ्या दिग्गजांच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध भाजपाचे सुजय विखे यांच्यात थेट लढत होणार स्पष्ट असताना अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार निलेश लंकेंनी अर्ज भरत ट्विस्ट निर्माण केलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधलाय.
दोन निलेश लंकेंचे अर्ज : मे महिन्यातील 13 तारखेला महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपलीय. मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीकडून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघात जवळजवळ विखे विरुद्ध लंके अशी लढत राहणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन निलेश लंके आणि सुजय विखे असा सामना रंगणार आहे.
सुजय विखेंवर टीका : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष निलेश लंके यांनी एन्ट्री केल्यामुळं मतदारसंघातील राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांच्यावर टीका केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील यात उडी घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजय विखे यांच्यावर हल्लाबोल केलाय.