मुंबई Aaditya Thackeray On Bharat Ratna : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. आता खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही याबाबतची मागणी केंद्राकडं केलीय.
ठाकरेंची भाजपावर टीका :केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केलीय. पंतप्रधान मोदींनी 'X' वर पोस्ट करून ही माहिती दिली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राच्या या निर्णयावरून राजकीय आरोपही सुरू झालेत. अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध केलाय तर काहींनी त्याचं स्वागतही केलंय. त्यामुळं आता केंद्र सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्यावा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलीय.
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी : बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्राकडं केलीय. यासोबतच त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. भाजपावर आरोप करताना ते म्हणाले की, "भाजपा ही बाळासाहेबांसोबतची मैत्री आणि त्यांचं योगदान विसरलं आहे, अन्यथा ते आमच्या पक्षाशी, उद्धव ठाकरेंशी असं वागले नसते."
राज ठाकरे आणि संजय राऊत यांची मोदींकडं मागणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न जाहीर करताच सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय.
मुलायम सिंह यांना भारतरत्न देण्याची मागणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, स्वामीनाथन, पी. व्ही. नरसिंह राव, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर देशातील अनेक राजकीय पक्ष हे आपआपल्या नेत्यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळं रविवारी (11 फेब्रुवारी) समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर मुलायम सिंह यादव यांनाही भारतरत्न देण्याबाबतचे पोस्टर लावण्यात आले होते. मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी होत असून, आता आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय.
हेही वाचा -
- पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?
- निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्नचे वाटप, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
- एकाचवेळी तिघांना भारतरत्न; नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान