छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या तीन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचवेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी व्यावसायिक थेट दुबईहुन शहरात दाखल झाला. अवघ्या एका दिवसासाठी त्यांनी एवढा मोठा प्रवास केला तोही मतदान करण्यासाठी. व्यवसाय दुबईत असला तरी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि देशाचं भविष्य चांगलं राहावं यासाठी मतदान केल्याची भावना व्यावसायिक राकेश पाटील यांनी व्यक्त केली. तसंच लोकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा जेणेकरुन एक चांगलं सरकार आपण देऊ शकू, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.
कर्तव्य म्हणून केलं मतदान : शहरातील सिडको भागात राहणारे राकेश पाटील यांनी दुबईहून येऊन मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वीस वर्षापासून ते दुबई इथं व्यवसाय करत आहेत. मात्र, नाळ अद्यापही देशाशी जोडून आहेत. मतदान घोषित झाल्यानंतर आपलं कर्तव्य पार पाडावं असा निर्धार त्यांनी केला आणि त्यामुळंच 13 मे रोजी भारतात येऊन मतदान करायचं असा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी दुबईहून थेट संभाजीनगर गाठलं. ते सकाळी सात वाजता शहरात दाखल झाले, दुपारी तीन वाजता त्यांनी सिडको येथील संत मीरा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. रात्री मुंबई आणि सकाळी तिथून दुबई असा प्रवास ते करणार आहेत. जगात सर्वात भक्कम लोकशाही भारतात असून ती बळकट करण्याचं आपले कर्तव्य असल्यानं मतदान केल्याचं राकेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.