नवी दिल्ली Japanese Public Health Tie Up With NICED : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, जेव्हा जपानला विषाणूच्या वैशिष्ट्यांबद्दल पुरेशी माहिती गोळा करता आली नाही, तेव्हा जपानमधील एका आघाडीच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेनं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजेस माहितीशी भागीदारी करण्याचा आणि माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशा परिस्थितीत जपाननं हीच भारतीय संस्था का निवडली?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच याचा भारताला कसा फायदा होईल? याविषयी आपण जाणून घेऊया.
जपानी वृत्तपत्र योमिउरी शिम्बुनमधील वृत्तानुसार, जपानची राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कोलकातास्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजेसपासून सुरू होणारे नेटवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. तसंच योमिउरी शिंबुननं दिलेल्या अहवालानुसार, 'कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान, संक्रमण राष्ट्रीय सीमा ओलांडून पसरले, तर देश व्हायरसच्या वैशिष्ट्यांबद्दल पुरेशी माहिती गोळा करू शकले नाहीत.' यामुळं NIID ला नेटवर्क तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्याची सुरुवात 2023 मध्ये झाली असून 2026 च्या सुरुवातीला नेटवर्क सुरू होईल.' अहवालानुसार, सध्या NIID ICMR-NICED सह इतर तीन संस्थांच्या सहकार्यानं संसर्गजन्य रोगांच्या घटनांची तपासणी केली जाईल.
राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्था म्हणजे काय? :NIID ही एक सरकारी संशोधन संस्था असून ही संस्था जपानमधील संसर्गजन्य रोगांवर पाळत ठेवते आणि संबंधित संशोधन करते. ही संस्था आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असून सार्वजनिक आरोग्य आणि रोग नियंत्रणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. NIID ची स्थापना 1981 मध्ये संसर्गजन्य रोगांशी संबंधित अनेक विद्यमान संशोधन संस्थांच्या विलीनीकरणाद्वारे करण्यात आली. त्यांचं मुख्यालय टोकियोत असून त्यांची प्राथमिक सुविधा शिंजुकू येथे आहे.
ही संस्था संसर्गाशी संबंधित संशोधन करते. यामध्ये व्हायरोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी आणि इम्युनोलॉजी यांचा समावेश होतो. संस्थेकडं त्यांच्याशी संबंधित प्रयोगशाळा आणि संशोधन गट आहेत. NIID जागतिक आरोग्य संघटना (WHO), रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) आणि इतर संशोधन संस्थांसोबत जागतिक आरोग्य समस्यांचं निराकरण करण्यासाठी सहयोग करते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीज (NICED) म्हणजे काय? :1962 मध्ये कॉलरा संशोधन केंद्र म्हणून या संस्थेची स्थापना केली गेली. मात्र, त्याचं नाव बदलून 1979 मध्ये NICED करण्यात आलं. येथे आंतरीक रोग आणि एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, उपचार आणि नियंत्रणासाठी धोरणं विकसित केली जातात. NICED चे मुख्यालय कोलकाता येथे असून 1980 मध्ये, WHO ने या संस्थेला अतिसाराच्या आजारांवरील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी WHO सहयोगी केंद्र म्हणून मान्यता दिली. NICED विविध प्रकारच्या अतिसाराच्या आजारांवर तसंच विषमज्वर, हिपॅटायटीस आणि HIV/AIDS-संबंधित रोगांवर संशोधन करते. मूलभूत आणि उपयोजित अशा दोन्ही बाजूंनी या आजारांवर संशोधन करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.