हैदराबादEl Nino :पॅसिफिक महासागरात उद्भवणाऱ्या 'एल निनो'मुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागात दुष्काळ पडण्याची शक्याता आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळं भारताला आर्थिक फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर एल निनोचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होतो? तसंच 2024 मध्ये एल निनोचा काय परिणाम होऊ शकतो? याबाबत आज आपण या लेखात जाणून घेऊयात.
प्रशांत महासागरातील तापमान वाढ : 'एल निनो'ला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळं समुद्रातील घटनेबाबत नागरिकांची उत्सुकता वाढली आहे. उष्णकटिबंधीय पूर्व प्रशांत महासागरातील तापमानवाढीचे परिणाम आणि दक्षिण अमेरिकन देश पेरूच्या महासागरात काय घडत आहे याची चिंता भारतीय जनतेने का करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, जागतिक तापमानवाढीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानात होणारी वाढ ही दक्षिण आशियाई मान्सूनसह जगातील अनेक भागांतील पावसाशी संबंधित आहे. सामान्य काळात वारे पूर्वेकडून पश्चिमेकडं समांतर वाहतात. त्यामुळं दक्षिण अमेरिकेपासून पॅसिफिक महासागरातील पाऊस आशियाई बाजूकडं जाण्यास मदत होते. बाष्पयुक्त वारे या प्रदेशातील वरच्या कोमट पाण्याला दूर ढकलण्यास मदत करतात. ज्यामुळं थंड पाणी तळापासून वर येण्यास मदत होते. या क्रियातून सूक्ष्म प्लँक्टनपासून माशांपर्यंत सागरी जीवनाला वाढण्यास मदत होते. परंतु एल निनोच्या काळात, वारे पावसाला अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडं ढकलतात.
तापमानाचा पावसाशी संबंध :या प्रक्रियेचा पहिला शोध गिल्बर्ट थॉमस वॉकर यांनी लावला होता. त्यांनी 1904 मध्ये भारतातील हवामान वेधशाळांचे महासंचालक म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी आपल्या गणितीय ज्ञानाचा उपयोग भारतासह जगाच्या इतर भागांतील हवामानचे मापदंड विकसित करण्यासाठी केला. भारत तसंच पॅसिफिक महासागर यांच्यातील वायुमंडलीय दाबाचा पॅटर्न, भारतासह उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील परिवर्तनीय तापमानाचा पावसाशी संबंध सांगणारे वॉकर पहिले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या निष्कर्षांकडं कोणीही फारसं लक्ष दिलं नाही. गिल्बर्ट वॉकर यांच्या नावावर असलेल्या तथाकथित "वॉकर सर्क्युलेशन"चा पुनर्शोध 1960 मध्ये उपग्रह निरीक्षणांच्या मदतीनं शक्य झाला. महासागर आणि वातावरणाचा संबध जोडलेला असल्याचं त्यावेळी गिल्बर्ट वॉकर यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं. या दोन्ही घटनांचा जागतिक हवामानावर परिणाम होतो, असं वॉकर यांनी म्हटलं होतं. आजकाल प्रगत सॅटेलाईट तंत्रज्ञानच्या मदतीनं अतिशय उच्च-रिझोल्यूशन रेडिओमीटरनं गोळा केलेला डेटा महासागरांच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विसंगतींवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. त्यामुळं हवामानासह महासागराचा अभ्यास करण्यास मदत होते.