तैपेई Earthquake In Taiwan : तैवानला बुधवारी सकाळी भूकंपाचा मोठा हादरा बसल्यानं नागरिकांची मोठी धावपळ झाली. या भूकंपात गगनचुंबी इमारती कोसळल्या असून भूकंपानं नागरिकांना मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात पाच मजली इमारतीचा पहिला मजला कोसळला असून बाकीचा भाग 45 अंशाच्या कोनात जमिनीला टेकला आहे. तैवानला बसलेला भूकंपाचा धक्का हा 7.2 रिश्टल स्केलचा असल्याची माहिती तैवानच्या हवामान विभागानं दिली आहे. या भूकंपात आतापर्यंत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
भूकंपात एकाचा मृत्यू तर 50 नागरिक जखमी :तैवानमध्ये आलेल्या भूकंपात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तैवानमधील गगनचुंबी इमारती कोसळल्यानं घटनास्थळावर बचावकार्य करण्यात येत आहे. तैवानमध्ये आलेला भूकंपाची तिव्रता 7.2 रिश्टल स्केल असल्याची माहिती तैवानच्या हवामान विभागानं दिली आहे. मात्र दुसरीकडं अमेरिकी भूवैज्ञांनिक सर्वेक्षण विभागानं हा भूकंप तब्बल 7.4 रिश्टल स्केल तिव्रतेचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तैवान भूकंप निरीक्षक पथकाचे प्रमुख वू चिएन-फू यांनी सांगितलं की, "चीनच्या तटापासून दूर असलेल्या किनमेन द्विपापर्यंत भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे. सुरुवाती भूकंपाच्या एका तासानंतर तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत."
जमिनीला टेकल्या गगनचुंबी इमारती :तैवानमध्ये आलेल्या भूकंपानं मोठा हादरा बसला आहे. तैवानमधील गगनचुंबी इमारती जमिनीला टेकल्या आहेत. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. इमारतींचा मलबा रस्त्यावर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकातील जवान बचावकार्यात गुंतले आहेत.