महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट; 8 सुरक्षा कर्मचारी ठार, 40 जखमी - PAKISTAN SUICIDE BLAST NEWS

बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढून 8 वर पोहोचली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले.

pakistan Suicide blast News
बलुचिस्तान आत्मघातकी हल्ला (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 7:48 AM IST

क्वेटा- दहशतवाद्यांसाठी नंदनवन म्हटल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत भागात शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाले. तर भयंकर अशा स्फोटात 40 हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये बहुतांश सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्ताननं बंदी घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मीनं (बीएलए) घेतली आहे.

तुर्बतच्या धांग भागात आत्मघातकी हल्लेखोरानं प्रवासी व्हॅन आणि जवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. या परिसरात मोठा स्फोट झाल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं सावट निर्माण झाले. पॅसेंजर व्हॅनमध्ये प्रवास करणारे बहुतांश सुरक्षा कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर सुरक्षा दलाचं पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराला वेढा घालून कारवाई केली. बचाव पथकानं जखमी आणि मृतांना स्थानिक रुग्णालयात पाठवले आहे. जखमींपैकी काहीजणांचा प्रकृती चिंताजनक आहे.

  • बलुच लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी म्हटलं, "बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेड फिरदाईने (आत्मघाती पथक) तुर्बतमध्ये कब्जा केलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी आमची संघटना घेत आहे".

पोलीस अधिकाऱ्यांसह कुटुंबाला लक्ष्य-बीएलएनं यापूर्वीदेखील बलुचिस्तानात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करून वारंवार प्राणघातक हल्ले केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी एसएसपी जोहेब मोहसीन हे कुटुंबासह विवाह समारंभाला जाण्याकरिता व्हॅनमध्ये बसले होते. त्यांन लक्ष्य करण्याकरिता हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी आत्मघातकी हल्ल्याचा निषेध केला.

कशामुळे होतात पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर हल्ले?बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. पण तिथे लोकसंख्या विरळ आहे. हे बलूच अल्पसंख्याक असून त्यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून भेदभाव केला जातो, अशी बलुचिस्तान नागरिकांची भावना आहे. बलुचिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक असल्यानं बलुचिस्तानमध्ये यापूर्वीदेखील बॉम्बस्फोट झाले आहेत. अनेक फुटीरतावादी गट हल्ले सुरक्षा दलांना लक्ष्य करतात. पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या (ISPR) आकडेवारीनुसार बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमध्ये सुरक्षा दलांनी एकूण 57,775 कारवाया केल्या आहेत.

हेही वाचा-

ABOUT THE AUTHOR

...view details