नवी दिल्ली/ढाका Bangladesh Reservation Violence : बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनानं देशभरात हिंसक रूप धारण केलंय. हिंसाचारग्रस्त भागामधून लोक स्थलांतर करत आहेत. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, "आतापर्यंत शेकडो भारतीय विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गानं देशात परतले आहेत."
भारतीय नागरिकांना मदत : परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, "ढाका येथील भारतीय उच्चायुक्त, चितगाव, राजशाही, सिल्हेट, खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्तालयं भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी मदत करत आहेत. उच्चायुक्त, सहायक उच्चायुक्तालय, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं भारतीय नागरिकांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यास मदत करत आहेत. परराष्ट्र मंत्रालय हे नागरी विमान वाहतूक मंत्रालय, इमिग्रेशन, भू-बंदरे, बीएसएफ अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे."
शेकडो विद्यार्थी परतले :मंत्रालयानं पुढं माहिती दिली की "आतापर्यंत 778 भारतीय विद्यार्थी विविध भू-बंदरांमधून भारतात परतले आहेत. याशिवाय, सुमारे 200 विद्यार्थी ढाका, चितगाव विमानतळांवरून नियमित विमानसेवेनं घरी परतले आहेत. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय, सहयोगी उच्चायुक्त हे बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये राहणाऱ्या ४००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या नियमित संपर्कात आहेत. नेपाळ, भूतानमधील विद्यार्थ्यांनाही भारतात येण्यासाठी मदत केली जात आहे."
पुन्हा निदर्शनं का होत आहेत? : आंदोलक विद्यार्थी प्रामुख्यानं स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी राखीव नोकऱ्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलक हे पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या समर्थकांची बाजू मांडणारी प्रणाली संपवण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत, ज्यांनी बांगलादेश मुक्ती युद्धाचं नेतृत्व केलं होतं. त्याऐवजी गुणवत्तेवर आधारित प्रणाली लागू करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. याबाबत हसनत अब्दुल्ला म्हणाले, "विद्यार्थ्यांना वर्गात परतायचं आहे, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच ते पुढील शिक्षणसाठी वापस येतील."