नवी दिल्ली Maldives President Mohamed Muizzu : भारत आणि मालदीवमधील संबंध सध्या नाजूक अवस्थेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
मुइज्जू यांची नरमाईची भूमिका : हा वाद उत्पन्न झाल्यानंतर, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. त्यांनी भारताच्या सैन्याला मालदीव सोडण्यास सांगितलं. मात्र त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मायदेशात उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहून आता मुइज्जू यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मुइझू यांनी नुकतेच दोन्ही भारत आणि मालदीवच्या संबंधांची प्रशंसा केली.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या : मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात मुइज्जू यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन केलं अन् दोन्ही देशांमधील संबंध आणि परस्पर आदर यावर भर दिला. राष्ट्रपती कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात मालदीवच्या जनतेच्या आणि सरकारच्या वतीनं भारताच्या जनतेचं आणि सरकारचं अभिनंदन केलं. मालदीवनं भारताला शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मालदीव आणि भारताची मैत्री शतकानुशतकं जुनी आहे, असं ते म्हणाले.