महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

दावोसमध्ये देवाभाऊंचा डंका; उद्योगपती म्हणतात, 'बाहर बर्फ, लेकीन अंदर गरमी है'; पहिल्याच दिवशी 'इतक्या' कोटींचे करार - DEVENDRA FADNAVIS IN DAVOS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस इथं होणाऱ्या वर्ल्ड एकोनॉमिक्स फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसला गेले आहेत. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशी तब्बल 18 करार केले.

Devendra Fadnavis In Davos
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 7:13 AM IST

Updated : Jan 22, 2025, 12:36 PM IST

मुंबई :दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. यातून सुमारे 92 हजार 235 रोजगार निर्मिती होणार आहे. यातील सर्वात मोठा करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्याबरोबर करण्यात आला. तो स्टील, नविनीकरण ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है -सज्जन जिंदाल :"आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडत आहे. पण, इथं आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्यानं गर्मी आहे," असं सज्जन जिंदाल म्हणाले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल, तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असं मी त्यांना सांगितलं," असंही सज्जन जिंदाल म्हणाले.

पहिला करार हा गडचिरोलीसाठी जिल्ह्यासाठी :गडचिरोली जिल्ह्यासाठी कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी करार झाला. यात गुंतवणूक 5 हजार 200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. मंगळवारी झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. यात लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था :यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला आहे. ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांबाबतचे 'हे' सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडं; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?
  2. इंदिरा गांधी माझ्यासाठी 'खलनायक'; इमर्जन्सीच्या स्पेशल शोमध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
  3. पान‍िपतमध्ये शिवाजी महाराजांचा उभारणार पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Last Updated : Jan 22, 2025, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details