लंडन :ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला असून मजूर पक्षानं मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर केयर स्टारमर यांनी देशाला संभोधित केलं. जनतेला संबोधित करताना त्यांनी ब्रिटनला एक मजबूत देश बनवण्यावर भर दिला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव करत केयर स्टारमर यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्या मजूर पक्षाने 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. केयर स्टारमर यांनी राजा चार्ल्स तिसरा यांच्याशी बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतली. परंपरेनुसार, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये हातांचं चुंबन नावाचा समारंभ आयोजित केला जातो.
स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान :ब्रिटन (यूकेचे) नवे पंतप्रधान म्हणून केयर स्टारमर यांनी शुक्रवारी आपल्या पहिल्या भाषणात ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाच्या प्रचंड विजयानंतर देशाची पुनर्बांधणी करण्याचे वचन दिलंय. राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले: "आमचं काम आम्ही आजपासून सुरू करतो". ऋषी सुनक यांच्या जागी गुरूवारी यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर मजूर पक्षाला मोठा विजय मिळाला आहे . ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी हॉलबॉर्न तसंच सेंट पॅनक्रस या जागांवर विजय मिळवलाय. मजूर पक्षाच्या विजयावर 61 वर्षीय केयर स्टारमर म्हणाले की, ‘मी तुमचा आवाज होईन, मी तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमच्यासाठी दररोज लढेन.’ स्टारमर यांनी विजयानंतर शुक्रवारी विजयी भाषण केलं. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. मात्र, सुनकनं आपली जागा राखण्यात यश मिळवलं आहे. त्यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड तसंच नॉर्थलर्टन जागा जिंकली आहे.