वॉशिंग्टन डीसी First Presidential Debate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अध्यक्षीय वादविवादात सामील झाले. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका होता आहेत. त्या पार्श्वभूमीवर या डिबेटकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेत निवडणुकांचा काळ जवळ आल्यानंतर अशा प्रकारचे डिबेट आजोजित केले जातात.
अमेरिकेत कधी आहेत निवडणुका? : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा प्रचार आणि आपापले मुद्दे अमेरिकन जनतेसमोर ठेवण्याचे काम दोन्ही पक्ष करत आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.
‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ म्हणजे काय? : अमेरिकेमध्ये द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही आहे. तिथे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी जाहीर वादविवाद करण्याची प्रथा आहे. याला ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ असे म्हणतात. सामान्यत: तीन प्रेसिडेन्शियल डिबेट्स केल्या जातात. त्यातील पहिला वादविवाद आज होत आहे. हा वादविवाद टेलिव्हिजनवर प्रसारित केला जातो. फक्त अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील माध्यमांना आणि राजकारण्यांना चर्चेसाठी नवनवे विषय यामुळं प्राप्त होतात.