शिकागो Indian Student Attacked In Chicago : परदेशात भारतीयांवर होणारे हल्ले काही नवीन नाहीत. नुकतीच अशाप्रकारची आणखी एक घटना अमेरिकेतील शिकागो शहरात घडली. येथे मंगळवारी (6 फेब्रुवारी) एका भारतीय विद्यार्थ्यावर भीषण हल्ला झाला. हा विद्यार्थी मूळचा हैदराबादचा आहे. भारतीय दूतावासानं या घटनेची नोंद घेत त्याच्या कुटुंबियांना शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. दूतावासानं या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये या विद्यार्थ्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचं दिसतंय. या घटनेसंबंधी एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, ज्यात शिकागोच्या रस्त्यावर तीन हल्लेखोर विद्यार्थ्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. या प्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली.
बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू : गेल्या आठवड्यात अमेरिकेतील श्रेयस रेड्डी नावाचा भारतीय विद्यार्थी सिनसिनाटी, ओहायो येथे मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, तो लिंडर स्कूल ऑफ बिझनेसचा विद्यार्थी होता. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासानं या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि सांगितलं की ते त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.
भारतीयांवरील हल्ले वाढले : उल्लेखनीय म्हणजे, आठवडाभरात भारतीय विद्यार्थ्याचा हा तिसरा मृत्यू होता. 30 जानेवारी रोजी, पर्ड्यू विद्यापीठातील नील आचार्य हा विद्यार्थी अनेक दिवस बेपत्ता झाल्यानंतर मृतावस्थेत सापडला होता. त्याचप्रमाणे, 29 जानेवारीला, विवेक सैनी या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेतील लिथोनिया, जॉर्जिया येथे एका दुकानात एका बेघर माणसानं हातोड्यानं अनेक वार करून निर्घृणपणे ठार मारलं होतं.
हे वाचलंत का :
- ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान, सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना
- हुथी बंडखोरांवर अमेरिकेची मोठी कारवाई, येमनमधील ठिकाणांवर केले जोरदार हवाई हल्ले
- भारतीय वंशाच्या जोडप्याला ब्रिटनमध्ये 33 वर्षांची शिक्षा, कोकेन तस्करीकरिता सुरू केली होती कंपनी