इस्लामाबाद : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा दावा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे समर्थन असलेले नेते करत आहेत. यावर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियननंही प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुकीत मुख्य लढत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि पीटीआय-समर्थित उमेदवारांमध्ये होती. यामध्ये इम्रान खान समर्थित उमेदवारांनी विजय नोंदवला. मात्र दोन्ही पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.
हेराफेरीची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी : पाकिस्तानमध्ये 265 जागांवर निवडणुका झाल्या. इथे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 133 जागांची आवश्यकता आहे. याशिवाय महिला आणि अल्पसंख्याकांसाठी 70 जागा राखीव आहेत. अमेरिका आणि युरोपियन युनियननं म्हटलं की, जर स्थानिक नेते निवडणुकीत हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांच्या अटकेचा दावा करत असतील तर निवडणुकीतील अनियमितता, हस्तक्षेप आणि हेराफेरीची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे.
हिंसाचाराचा निषेध : युरोपियन युनियननं आपल्या निवेदनात, काही नेत्यांवर निवडणूक लढविण्यावर बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इंटरनेटवरील निर्बंधांचा उल्लेख केला. युनियननं सर्वांना समान संधी दिली नसल्याचं म्हटलं आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटनं निवडणुकीत हिंसाचाराचा आणि प्रसारमाध्यमांवरील हल्ल्यांचा उल्लेख केला आणि इंटरनेट सेवेवरील निर्बंध चुकीचे असल्याचं म्हटलं. निवडणुकीपूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगानंही राजकारणी आणि राजकीय पक्षांवरील हिंसाचाराचा निषेध केला होता.