Israel warning to Hezbollah : इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाइट्समधील माजदल शम्स शहरातील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 लहान मुलांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे हिजबुल्लाहचा हात आहे, असा आरोप इस्रायलकडून केला जात आहे. हिजबुल्लाहनं गेल्या दहा महिन्यांत केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्री इस्रायल पॅट्झ यांनी थेट युद्धाचा इशारा दिला आहे. मात्र, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलाय.
हमास नंतरचा सर्वात मोठा हल्ला :इस्रायलच्या सैन्यदलाच्या दाव्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर झालेला हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. गोलन हाइट्समध्ये झालेल्या हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू झाला. तर 44 जण जखमी झाले. हिजबुल्लाहनं आपल्या सैनिकांच्या हत्येचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचा इस्रायलकडून दावा करण्यात येत आहे. इस्त्रायलच्या सैन्यदलाच्या दाव्यानुसार गोलान हाइट्सवरील रॉकेट हे दक्षिण लेबनॉनमधील चेबा गावाच्या उत्तरेकडील भागातून डागण्यात आले.
मोठी किंमत चुकवावी लागेल : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले, "हिजबुल्लाहचा हा प्राणघातक हल्ला पाहून मलाही धक्का बसला आहे. हिजबुल्लाहला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. या कठीण काळात आपले नातेवाईक गमाविणाऱ्या लोकांसोबत आम्ही आहोत." अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले बेंजामिन नेतन्याहू यांना हल्ल्याची माहिती मिळताच ते तातडीनं मायदेशी परतले.