मॉस्को Terror Attack In Russia : दहशतवाद्यांनी चर्चवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 20 जण ठार तर 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला रशियातील दागेस्तान या दक्षिणेकडील प्रांतात केला आहे. रशियाच्या रिपब्लिक ऑफ दागेस्तानच्या तपास संचालनालयानं दहशतवादी हल्ल्याप्रकरणी रशियन फेडरेशनच्या फौजदारी संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या समितीनं तपास सुरू केल्याची माहिती तपास संचालनालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. डर्बेंट आणि मखाचकला शहरातील चर्च, सिनेगॉग आणि पोलीस ट्रॅफिक स्टॉपमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहितीही या प्रवक्त्यानं दिली.
सनातन चर्च, सिनेगॉगमध्ये दहशतवादी हल्ला : दहशतवाद्यांनी चर्चमध्ये हल्ला करुन धर्मगुरुची हत्या केली. तर चर्चच्या सुरक्षा रक्षकालाही गोळ्या घालण्यात आल्याची माहिती तपास संचालनालयानं दिली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही पोलीस आणि एका धर्मगुरुची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तब्बल 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. "दहशतवाद्यांनी धर्मगुरु निकोले यांची डर्बेंट चर्चमध्ये हत्या केली. धर्मगुरु निकोले हे 66 वर्षाचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मात्र दहतवाद्यांनी त्यांचा गळा चिरुन हत्या केली," अशी माहिती दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलाएव यांनी वृत्तसंस्थेला दिली.