ओटावा : खलिस्तानी दहशतवादावरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर अनेकदा टीका केली आहे. मात्र भारतानंही जस्टीन ट्रुडो यांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं. आता जस्टीन ट्रुडो यांच्याबाबत महत्वाची घडामोड घडत आहे. पक्षांमध्ये वाढत असलेल्या त्यांच्याबाबतच्या मतभेदावरुन मोठा असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत कॅनडाच्या एका आघाडीच्या माध्यम समूहानं त्यांच्या पक्षाच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जस्टीन ट्रुडो हे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय लिबरल पार्टी कॉकससमोर बुधवारी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. लिबरल पक्षानं नवीन नेतृत्व शोधण्यास सुरुवात केली असल्याचंही या प्रसारमाध्यमानं स्पष्ट केलं आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 2015 मध्ये आले सत्तेवर :कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे 2015 मध्ये सत्तेवर आले होते. त्यानंतर त्यांनी 2019 आणि 2021 मध्ये आपली सत्ता कायम राखली. मात्र सत्तेवर आल्यानंतर जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षात अनेक मतभेद असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे जस्टीन ट्रुडो यांच्याबाबत असंतोष उफाळून आला. पक्षातील अंतर्गत बंड कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना मोडून काढता आले नाहीत. त्यामुळे आता जस्टीन ट्रुडो यांना केव्हाही आपला राजीनामा सादर करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय कॉकस बैठकीपूर्वी जस्टीन ट्रुडो देऊ शकतात राजीनामा :कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सत्ता संपादन केल्यानंतर पक्षात मतभेद उफाळून आले. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटिव्ह पियरे पॉइलीव्हरे यांनी जनमत सर्वेक्षणात 20 गुणांनी मागं टाकलं. त्यामुळे जस्टीन ट्रुडो यांच्या पक्षात मोठी चलबिचल झाली. नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितलं की पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची फक्त वेळ अनिश्चित आहे. बुधवारी महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कॉकस बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी ते राजीनामा देण्याची घोषणा करतील, असा त्यांचा अंदाज आहे. "जस्टीन ट्रूडो यांना त्यांच्या खासदारांनी हकालपट्टी टाळण्यासाठी कॉकस बैठकीपूर्वी घोषणा करण्याचं महत्त्व समजलं आहे," अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.