बँकॉक :थायलंडमध्ये एका विमानात ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळून आला आहे. थायलंडमधील एअर एशिया या विमान कंपनीचे प्रवासी विमान राजधानी बँकॉकहून फुकेत शहरासाठी उड्डाण करणार होते. विमान टेक ऑफ करणार असतानाच एका प्रवाशानं विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये साप सरकत असल्याचं पाहिलं. त्यानंतर विमानात एकच गोंधळ निर्माण झाला. विमानातील अनेक प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये एक फ्लाइट अटेंडंट पाण्याच्या बाटलीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बँकॉकवरून फुकेतला जाणाऱ्या एअर एशिया फ्लाइटमधील प्रवाशांना ओव्हरहेड केबिनच्या वरच्या बाजूला एक साप दिसला.' अशी पोस्ट या युजरनं शेअर केली आहे.
एअर एशियाचं निवदेन जारी :एअर एशिया, थायलंडनं या घटनेनंतर एक निवेदन जारी केलं आहे. बँकॉकच्या डॉन मुआंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 जानेवारीला उड्डाण केलेल्या FD 3015 या विमानात एक साप दिसला. आम्हाला या घटनेची माहिती आहे.' असं या निवेदनात म्हटलं आहे.