का साजरा केला जातो जागतिक नारळ दिन ; जाणून घ्या नारळ खाण्याचे फायदे - World Coconut Day 2024 - WORLD COCONUT DAY 2024
World Coconut Day 2024 : नारळाची बहुमुखी उपयुक्तता आणि मागणी बघता दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळाच्या एकट्या खोबरेल तेलाचेच अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील नारळ उपयुक्त आहे. वाचा सविस्तर...
हैदराबाद World Coconut Day 2024 : नारळाचे महत्व आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये असलेलं विविध योगदान पाहता त्याला 'ट्री ऑफ लाईफ' म्हणून संबोधलं जातं. एवढेच नाही तर, नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवायाचा काही ना काही उपयोग नक्कीच होतो. त्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जातं. एवढंच नाही तर नारळाची उपयुक्तता पाहता दरवर्षी २ सप्टेंबरला भारतासह प्रमुख नारळ उत्पादक देशांमध्ये जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून जाणून घेऊयात नारळाचे निराळे फायदे.
जागतिक नारळ दिवस इतिहास : सन 2009 पासून आशियाई पॅसिफिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी (ICC) या संस्थेनी या दिवसाची स्थापना केली.
नारळाच्या एकट्या खोबरेल तेलाचेच अनेक फायदे आहेत. खोबरेल तेल केवळ केसांनाच लावण्यासाठी नाही तर खाण्याचं तेल म्हणूनही अत्यंत उपयुक्त आहे. त्याची नाजूक चव सर्वांनाच भावते आणि ते सहज उपलब्ध देखील होते. त्याचे आरोग्य विषयक अनेक दुर्मिळ फायदे जाणून घेऊ.
शरीरातील चरबी जाळण्यासाठी उपयुक्त : आपले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आज प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतो. त्यासाठी खोबरेल तेलाचं सेवन उपयुक्त ठरू शकते. खोबरेल तेलाच्या वापरानं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.
सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त : आपल्या सौंदर्यात 'चार चांद' लावण्यासाठी आज बाजारात अनेक सौदर्य प्रसाधनं उपलब्ध आहेत. मात्र, अनेक प्रसाधनांमध्ये हानिकारक रसायनांचा उपयोग केला जातो. कालांतराने त्याचे विपरित परिणाम शरिरावर व त्वचेवर होतात. मात्र, खोबरेल तेलाचा नैसर्गिक मॉइश्चराझर म्हणून वापरता येतो. चेहऱ्यावरील बारीक रेषा, सूज आणि सुरकुत्या कमी करण्यास हे उपयुक्त आहे. डोळ्याखालील 'डार्क सर्कल' आणि त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील खोबरेल तेल फायद्याचं आहे.
अँटिसेप्टिक म्हणून वापर :एखाद्या जागी लागलं असेल तर त्या ठिकाणी खोबरेल तेल लावल्यास अँटिसेप्टिक म्हणून कार्य करतं. तसंच त्या भोवतालची त्वचा सतेज ठेवण्यासाठी देखील खोबरेल तेल उपयुक्त आहे.
हाडांसाठी खोबरेल तेल : शरीराच्या ऊती आणि स्नायुंच्या मजबुतीसाठी खोबरेल तेलापेक्षा चांगलं पर्याय असू शकत नाही. शिवाय ऑरगॅनिक खोबरेल तेल हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशिर आहे. त्यामुळे हाडं लवचिक होतात व ती खराब होण्यापासूनही वाचवली जावू शकतात.
लिप बामला पर्याय : खोबरेल तेलाचं मॉइश्चरायझर म्हणून ही वापर करता येतो. फाटलेल्या ओठांसाठी लिप बाम म्हणूनही हे वापरता येतं. एखाद्या डबीत खोबरेल तेल टाकून आवश्यकतेनुसार ओठांवर लावलं तर ओठं मॉइश्चराइज्ड राहतात.
केसांसाठी उपयुक्त: नारळाचे तेल केसांना कंडीशनिंग करण्याच काम करते. त्यामुळे केस गळण्यापासून तर त्यामधील कोंड्यावर देखील त्याचा उपचारात्मक उपाय करता येतो. खोबरेल तेलामधील व्हिटॅमिन के आणि लोहामुळे केसं चमकदार आणि रेशमी राहतात.
प्रतिकार शक्ती वाढते : खोबरेल तेलामध्ये अँटी-फंगल, अँटी व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. तेलाच्या नियमित सेवनानं रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरिया जन्य रोगांपासून दूर ठेवण्यास खोबरेल तेल उपयुक्त आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )