मुंबई- जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी 15 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. सामान्य माणसाचे ग्राहक म्हणून असेलेले हक्क, ग्राहक संरक्षण आणि सशक्तीकरण याबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्तानं केला जातो.
'ग्राहक हक्क' म्हणजे काय?
ग्राहक हक्क म्हणजे विविध उत्पादने, वस्तू आणि सेवा खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या उत्पादनांची गुणवत्ता, शुद्धता, किंमत आणि मानक यांची माहिती असण्याचा अधिकार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एक ग्राहक म्हणून कुठूनही, कधीही तक्रार नोंदवण्याचा अधिकार आहे. बहुतेक लोकांना ग्राहक म्हणून त्यांच्या हक्कांची जाणीव नसते, म्हणून हा दिवस इतरांना संरक्षणाची मागणी करण्याच्या आणि बाजारपेठेतील फसव्या व्यवहारापासून सुरक्षित राहण्याच्या अधिकाराची जाणीव करून देतो.
जागतिक ग्राहक हक्क दिनाचा इतिहास
जागतिक ग्राहक हक्क दिन अमेरिकाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याकडून प्रेरित झाला. त्यांनी 15 मार्च 1962 रोजी यूएस काँग्रेसला एक विशेष संदेश पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी औपचारिकपणे ग्राहक हक्कांच्या मुद्द्याला अधोरेखीत केले आणि असे करणारे ते पहिले जागतिक नेते बनले. ग्राहक चळवळीने ती तारीख 1983 मध्ये पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवून ग्राहक दिनाचे महत्त्व विषद केले. आता महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि मोहिमांवर कारवाई करण्यासाठी दरवर्षी या दिवसाचा वापर केला जातो.
जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम
दरवर्षी, जागतिक ग्राहक हक्क दिन सर्व ग्राहकांना प्रभावित करणाऱ्या विविध समस्यांवर भाष्य करणारी थीम घेऊन साजरा केला जातो. कंझ्युमर्स इंटरनॅशनलनुसार "ग्राहकांसाठी वाजवी आणि जबाबदार AI" ही 2024 मधील जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम आहे. जागतिक ग्राहक वकिल चळवळीद्वारे सर्व ग्राहकांसाठी योग्य डिजिटल फायनान्सची मागणी केली जाईल. या दिवशी, ग्राहकांच्या हितासाठी तसेच व्यवसाय त्यांच्याशी कसा संवाद साधतात यासाठी सरकारी नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात असंख्य मोहिमा आणि कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.
तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडणार आहे. ज्या प्रकारे आपण काम करतो, संवाद साधतो, माहिती गोळा करतो आणि बरेच काही गोष्टी आपण एआयच्या मदतीने करत असतो. ग्राहक सुरक्षितता आणि डिजिटल निष्पक्षतेवरही याचा गंभीर परिणाम होईल. चुकीची माहिती, गोपनीयतेचे उल्लंघन आणि भेदभावपूर्ण पद्धती या चिंतेचा विषय आहेत, तसेच एआय-चालित प्लॅटफॉर्म खोटी माहिती कशी पसरवू शकतात आणि पूर्वाग्रह कायम ठेवू शकतात हे धोकादायक आहे. निष्पक्ष आणि जबाबदार 'एआय'साठी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण त्वरीत हालचाल केली पाहिजे.