How To Use Washing Machine: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात महिलांचे घरकाम सोपे करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध आहेत. असंच एक गॅजेट आहे, ते म्हणजे वॉशिंग मशीन. मात्र, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याव्यतिरिक्त आपण ते योग्य प्रकारे वापरत आहोत की नाही, याचही निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत नसलेल्या काही चुकांमुळे महागडी वॉशिंग मशीन लवकर खराब होण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या वॉशिंग मशीन वापरताना करू नयेत.
- ठिकाण निश्चित करा:कपडे धुताना अनेक लोक वॉशिंग मशीन योग्य ठिकाणी आहे की नाही? ते न तपासता तसचं वापरतात. काही लोकं मशीन असमतोल ठिकाणी किंवा अडचणीच्या जागी ठेवतात. कपडे धुताना मशीन नेहमी समतोल पृष्ठभागावर आहे की नाही याची सहानिशा करणे फार गरजेचं आहे. कारण जर मशीन उतार आणि खडबडीत जागी असेल तर तीव्र दाबामुळे मशीन खराब होण्याची शक्यता असते. तसंच वॉशिंग मशीनचा आकारही खराब होण्याची शक्यता जास्त असते.
- मशीन स्वच्छ न ठेवणे : वॉशिंग मशीन नेहमी स्वच्छ ठेवावी. अन्यथा, तेथे साचलेल्या घाणेमुळे मशीन खराब होण्याची शक्यता असते तसंच या घाणेमुळे आपलं आरोग्यही धोक्यात येवू शकते. म्हणूनच किमान दर वीस दिवसांनी पाण्यात ब्लीच किंवा बेकिंग सोडा घालून आतील निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे.
- एकाच वेळी बरेच कपडे:काम लवकर आटोपण्याच्या नादात अनेक लोकं वॉशिंग मशिनमध्ये एकाच वेळी खूप कपडे घालतात. परंतु तुम्ही केलेल्या या छोट्याशा चुकीमुळे मशीनचे नुकसान होऊ शकते. कारण मशीनमध्ये जास्त कपडे घातल्यामुळे मोटार लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे जास्त असल्यास मशीनच्या क्षमतेनुसार कपडे दोन-तीन फेऱ्यांमध्ये धुणे चांगलं आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे. तसंच काही लोक लगेच कपडे न धुता ओले कपडे मशीनमध्ये ठेवतात आणि काही वेळानंतर धुतात. असं केल्यामुळे मशिन खराब होते, असं तज्ञ सांगतात.
- न तपासता कपडे घालणे:काही लोक कपडे न तपासता मशीनमध्ये टाकतात. यामुळे कधीकधी नाणी, पिन, टूथपिक्स इत्यादी पँटमध्ये राहतात. या वस्तू वॉशिंग मशीनच्या अंतर्गत भागांना नुकसान करू शकतात. म्हणूनच मशीनमध्ये कपडे घालण्यापूर्वी खिसे तपासणे गरजेचे आहे.
- जास्त प्रमाणात डिटर्जंट्स: वॉशिंग मशिनला इजा न करता जास्त दिवस टिकवण्यासाठी, तुम्ही कपडे धुताना एकाच वेळी खूप जास्त डिटर्जंट्स वापरत नाहीत याची खात्री करा. कारण, मशीनमध्ये ठरावीक प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता असते. अशात जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरल्यास ते डिटर्जंट मशीनमध्ये गोठायला लागते. परिणामी मशीनची मोटर जॅम होते. त्याच्या दुरुस्तीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.