मुंबई - World Theater Day 2024 : 27 मार्च हा दिवस 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये पहिल्यांदा युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरातील रंगकर्मी आवर्जून हा दिवस साजरा करतात.
जागतिक रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असताना मराठी रंगभूमीही त्याबाबतीत अजिबात मागे नाही. भारतीय रंगभूमीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नाटकाची परंपरा मराठीमध्ये अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्रातल्या रंगभूमीवर वैविध्यपूर्ण विषयांची दीर्घ परंपरा आहे. नाशिक येथील गुहेतील शिलालेखांमध्ये सातवाहन शासक गौतमीपुत्र सातकर्णी यांची आई गौतमी बालश्री यांच्या नाटकाचा एक प्रारंभिक संदर्भ सापडतो. मराठी रंगभूमीला जवळ जवळ 170 हूनही जास्त वर्षांची परंपरा आहे. 1843 ला नाटकाला डोक्यावर घेतलेल्या प्रेक्षकानं आजही ही रंगभूमी प्रयोगशील ठेवली आहे. 19 व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवासाची 1950 आणि 1960 च्या दशकात भरभराट झाली. स्वातंत्र्योत्तर काळात बंगाली, कन्नड आणि मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग झाले आणि नाट्यकलेनं आघाडी घेतली आहे.
मराठीमध्ये सुरुवातीला पौराणिक कथावंर आधारित नाटकांची निर्मिती झाली. सांगलीमध्ये विष्णूदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे नाटक मराठी रंगभूमीवर सादर केलं. 1880 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या कालिदासाच्या अभिज्ञानकुंतलम् या कलाकृतीवर आधारित मराठी रंगमंचाने एक वेगळे रंगभूमीचे रूप धारण केलं. त्यांच्या नाटय़संस्थेच्या यशाने किर्लोस्कर नाट्यमंडळी मराठी रंगभूमीवर व्यावसायिक पुनरावृत्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर नाटक कंपन्यांची निर्मिती झाली.
मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी आणि अण्णासाहेब किर्लोस्कर या नाटककारांचं वर्चस्व होतं. संगीत नाटकांनी मराठी रसिकांच्या मनात खूप मोठं स्थान मिळवलं. याच काळात बाल गंधर्व, केशवराव भोळे, भाऊराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गायक-अभिनेता रंगभूमीवर घडले.