हैदराबाद :पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मुलांना जे काही वातावरण द्याल, ते भविष्यात त्यानुसार जुळवून घेतात. घरात रोज भांडणे होत असतील, शाळेत शिक्षकांची वागणूक मुलाशी चांगली नसेल तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. शेजारच्या घरात रोज काही ना काही कुरबुरी होत असतील तर त्याचादेखील मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. यामुळे ते हट्टी, चिडचिड आणि उलट बोलू शकतात. त्यांना हाताळणं हे एक आव्हान आहे. ही समस्या किशोरवयीन मुलांमध्ये अधिक दिसून येते. कारण या काळात त्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. इतरही अनेक कारणे आहेत. त्यांच्याशी बोलूनही समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते. परंतु तरीही काही होत नसेल तर या पद्धती वापरून पहा.
भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या :मूडी मुलांना व्यवस्थित हाताळण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणे. जेणेकरुन मुले कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकतील. मुलांची अर्धी समस्या येथे सोडवली जाईल. प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या मूडमागे मुलांच्या आत दडपलेल्या भावना असू शकतात. शांतपणे बसून त्यांच्याशी बोलल्याने त्यांना बरे वाटेल.