Causes Of High Cholesterol: सध्या बहुतेक लोक उच्च कोलेस्ट्रॉलनं त्रस्त आहेत. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मुख्यतः अयोग्य खानपानपद्भतीमुळे अनेक लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या भेळसावत आहे. शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, धमण्यांचे रोग यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी सुरळीत ठेवणे गरजेचं आहे.
- काय आहे कोलेस्ट्रॉल:शरीरात एक मेणासारखा पदार्थ असतो त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एलडीएल कमी घनता असलेलं लिपोप्रोटीन आणि दुसरं म्हणजे एएचडीएल उच्च घनता लिपोप्रोटीन. उच्च घनतेचं लिपोप्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याला चांगलं कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात. कमी घनतेचं लिपोप्रोटीन आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. याला वाईट कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या चरबीला प्लेक म्हणतात. यामुळे हृदविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारण आहेत. प्रामुख्यानं खाण्याची अयोग्य सवय, धूम्रपान, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आजकाल उच्च कोलेस्ट्रॉच्या प्रकरणामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. या पाच प्रकारच्या लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका होण्याची जास्त संभावना आहे.
- कोण आहेत ते लोक?
- खाण्याची अयोग्य सवय असलेले लोक: एका अभ्यासानुसार ज्यांच्या आहारामध्ये ट्रान्स फॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते. आहारात तेल, तूप, लोणी आणि चीज जास्त प्रमाणात खाल्ल्यास देखील कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे. याव्यतिरिक्त जंक फूड, साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढतो.
- लठ्ठपणा: आजकाल बरेच लोक लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत. अनुवांशिक दोष, जास्त खाणं, चरबीयुक्त आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे वजन वाढते. यामुळे शेवटी लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका जास्त असतो. जर तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) ३० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे, अशा लोकांनी जास्त फॅटयुक्त पदार्थांपासून दूर राहावं. आहारासंबंधित योग्य काळजी घेतल्यास तुम्ही निरोगी जीनव जगू शकता.
- व्यायाम न करणे: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत बहुतांश लोकांकडे फार कमी वेळ असतो. यामुळे अनेकांना व्यायाम करणे कठीण जाते. व्यायामाला वेळ नाही. परिणामी अशा लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. व्यायामाच्या अभावामुळे उच्च कोलेस्ट्रालच नाही तर अनेक आजारांचा धोका असतो.
- धूम्रपान: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. या वाईट सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका असतो. धूम्रपान केल्यानं शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी, ज्या लोकांना ही वाईट सवय आहे त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो. उच्च कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त, हृदयरोग आणि रक्तदाब संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.
- अल्कोहोल: दारू देखील आरोग्यासाठी खूप घातक आहे. आजकाल तरुणवयातच लोकांना दारुचे व्यसन लागत आहे. परिणामी त्यांना अनेक आजारांचा धोका असतो. जे लोक दारू पितात त्यांना खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. अल्कोहोल शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल वाढवतं. तसंच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल वाढते. तज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त जे लोक दारूचे सेवन करतात त्यांना हृदयविकार, यकृत निकामी होणे, पक्षाघात आणि मानसिक आजाराचा धोका असतो.
- उच्च कोलेस्ट्रॉल कसे टाळावे:उच्च कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ टाळा. लोणी, तेल, तूप आणि शुद्ध अन्न कमीत कमी प्रमाणात खा. फॅटी अन्न खाऊ नका. तसंच आहारात मीठाचं सेवन कमी करा. प्राण्यांची चरबी अजिबात खाऊ नका. तसंच वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान आणि अल्कोहोल सोडा, दररोज 30 मिनिटं व्यायाम करण्याची योजना करा. आपल्या आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि ताजी फळांचा समावेश करा. सुका मेवा, बदाम, अक्रोड, पिस्ता इत्यादी तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ब्रोकोली, पालक, भेंडी, गाजर यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
संदर्भ
https://www.heart.org/en/health-topics/cholesterol/causes-of-high-cholesterol