Mumbai local train experience:स्वप्नांचं असं शहर, जेथे दररोज हजारो लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. येथे चमक, धमक आणि ग्लॅमर सर्वच आहे. हे आहे महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर, मायानगरी मुंबई. उंच इमारती, रात्रीची झगमग आणि इकडून तिकडे सतत धावपळ करणारे लोकं. हेच मुंबईचं आकर्षण आहे. मात्र, यातही खास आहे मुंबईची 'लाइफ-लाईन' म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल. येथे मेट्रो, बस, टॅक्सी आणि रिक्षा सर्वच वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. परंतु, तरीही लोकल रेल्वे शिवाय मुंबईची कल्पना करता येत नाही. आज याच मुंबई लोकलचा आपण प्रवास करणार आहोत.
21 दशलक्ष लोकसंख्या असणारी मुंबई, लोकल रेल्वेला आपली जीवनवाहिनी मानते. शहरात एकही व्यक्ती असा नसेल ज्यानं मुंबई लोकलचा प्रवास केलेला नाही. मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावलेली आशिया खंडातील ही पहिली रेल्वे होती. आज येथील रेल्वे लाईन्सची एकूण लांबी 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मुंबई लोकलचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठे आणि व्यस्त प्रवासी रेल्वे प्रणाली आहे. येथे दररोज 7.5 दशलक्ष लोकांसाठी 2300 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात.
- विविध संस्कृतीचे दर्शन :मुंबईमध्ये संपूर्ण भारतातून विविध सांस्कृतीक पार्श्वभूमी असलेले लोकं राहातात. अशात लोकल रेल्वेनं नियमित प्रवास करताना प्रवाशांची एकमेकांशी मैत्री होणं सामान्यच आहे. दरम्यान इतर महत्वाचे प्रसंग, वाढदिवस आणि विविध सण लोकलमध्ये प्रवासी साजरे करतात. दरम्यान येथे भाविकांद्वारे गायल्या जाणाऱ्या भजनांचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता. मुंबई लोकलचा हा एक विशिष्ट पैलूच आहे.
- किराना खरेदी :मुंबईच्या धावपळीत अनेकदा फार उशिरा पर्यंत काम करावं लागतं. अनेकदा त्यामुळं किराना सामानाच्या खरेदीसाठीसुद्धा वेळ काढता येत नाही. अशा लोकांसाठी थेट किराना सामानाची विक्रीच ट्रेनमधून केली जाते. यामध्ये विक्रेते फळं, भाजीपाला, फराळ, पुस्तकं, सौंदर्य प्रसाधनं आगदी कपडे देखील विकतात. घरी जाताना अनेक महिला भाज्या चिरताना तुम्हाला येथे दिसून येतील.
- डब्बेवाल्यांचा ट्रान्सपोर्ट सिस्टम: मुंबईत बहुतेक लोकं हे बाहेरून आलेले आहेत. त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था मुंबईनं केलेली आहे आणि ती व्यवस्था करतात मुंबईचे डबेवाले. बाहेरच्या लोकांना टिफिन सेवा पुरवणाऱ्या या डबेवाल्यांसाठी मुंबई लोकल डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करते. एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी डबे पोहोचवण्यासाठी हे डबेवाले पूर्णपणे मुंबई लोकलवर अवलंबून आहेत.