Immunity Boosting Vitamins: कोरोना सारख्या भयानक साथिनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं किती आवश्यक आहे याची सर्वांना जाणीव करून दिली. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या अनेकांना यामुळं जीव गमवावा लागला होता. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पाहिजे त्या प्रमाणात आपण आजारांशी सामना करू शकत नाही. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळते. ही चांगली ठेवण्यासाठी जीवनसत्त्वं महत्तवाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते, रोज विशिष्ट जीवनसत्त्वं असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानं आरोग्य चांगले राहू शकतं. चला तर जाणून घेऊया जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळं कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात.
व्हिटॅमिन 'सी':तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, व्हिटॅमिन 'सी' आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. असं म्हटलं जाते की, ज्या लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते, ते लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे आणि भाज्या आपल्या रोजच्या आहाराचा भाग असावा. यामध्ये संत्री, लिंबू याशिवाय शिमला मिरची आणि पालक देखील खाण्याची शिफासर केली जाते.
व्हिटॅमिन ‘सी’च्या कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन ‘सी’च्या कमतरतेमुळे शरीर थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा पातळ होणे, लोहाची कमतरता, सांधेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. तसंच काही वेळा दातांचा त्रास, हिरड्या सुजणे, रक्तस्त्राव अशा समस्या दिसून येतात, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
व्हिटॅमिन 'बी6': तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, व्हिटॅमिन 'बी6' रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारण्यास मदत करते. कोणत्याही संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ही जीवनसत्वं मदत करतात. डॉक्टरांच्या मते, आपण आपल्या रोजच्या आहारात केळी, मासे, चिकन, बटाटे आणि बीन्स सारख्या जीवनसत्व B6 समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेची लक्षणं: फिट, अपचन, अशक्तपणा, राग, त्वचा रोग, अशक्तपणा आणि पुरळ यासारखे रोग व्हिटॅमिन बी6 च्या कमतरतेमुळे होवू शकतात.
व्हिटॅमिन ई : व्हिटॅमिन ई आपल्या शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. याला 'ब्युटी व्हिटॅमिन' असेही म्हणतात. हे जीवाणू, विषाणू आणि इतर संक्रमणांशी प्रभावीपणे लढते आणि आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्यापासून थांबवते. तसंच व्हिटॅमिन ई जीवनसत्व रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक, या जीवनसत्त्वानं युक्त इतर धान्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
व्हिटॅमिन 'ई'च्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे : स्नायू कमकुवत होतात तसंच लाल रक्तपेशी कमी होतात. यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व, मासिक पाळी आणि गर्भपात होवू शकते असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणे आहे.