How Much Sugar Eat In A Day:आपल्यापैकी बहुतांश लोकांना गोड खाणं आवडतं. कोणताही सण असो किंवा समारंभ साखरेच्या गोडव्यानं तृप्त मिठाई नक्कीच असते. इतर देशाच्या तुलनेत भारतात गोड खाण्याचं प्रमाण जास्त आहे. अनेकांना जेवण झाल्यावर गोड किंवा मिठाई खायला आवडतं. परंतु, यामध्ये अतिरिक्त साखरेचं प्रमाण असते. जे आपल्या आरोग्यासाठी समस्या बनू शकते. गोड खाल्ल्यानं अनेक आजार होतात. यामुळे मधुमेह ग्रस्तांची संख्या तर वाढतच आहे परंतु साखरेच्या अतिवापरामुळे हृदविकाराचा धोका देखील वाढला आहे. आता साखरेला पांढरे विष म्हणून देखील ओळखलं जात आहे. जर एखाद्या व्यक्तीनं साखरेचं जास्त सेवन केलं तर त्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
शरीरात आवश्यक साखरेचं प्रमाण तुमच्या एकूण कॅलरी सेवन तसंच इतर घटकांवर अवलंबून असू शकतं. सर्वसाधारणपणे शक्य असल्यास साखरेचं सेवन टाळणं चांगलं आहे. कारण त्यात फायदेशीर पोषक तत्वांचा अभाव आहे. जास्त साखर खाल्ल्यानं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळे तुमच्या चयापचयाला हानी पोहोचते.
दररोज किती साखर खाणे सुरक्षित आहे?:अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एखाद्या व्यक्तीनं दररोज 150 कॅलरीज म्हणजेच 37.5 ग्रॅम (9 चमचे) पेक्षा जास्त साखर खाऊ नये. तसंच महिलांनी दररोज 100 कॅलरीज (6 चमचे) पेक्षा जास्त साखरेच सेवन करू नये. महिलांना त्यांच्या दैनंदिन साखरेचं प्रमाण 25 ग्रॅमपेक्षा जास्त मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पुरुषांनी दैनंदिन साखरेचं प्रमाण ३८ ग्रॅमपेक्षा कमी ठेवावं.
याउलट, यूएस आहार मार्गदर्शक तत्त्वे लोकांना त्यांच्या दैनंदिन कॅलरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी वापरण्याचा सल्ला देतात. दररोज 2,000 कॅलरी खाणाऱ्या व्यक्तीनं 50 ग्रॅम साखर किंवा सुमारे 12.5 चमच्या पेक्षा जास्त साखर खावू नये.
जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम
- जास्त साखर खाल्ल्यानं वजन वाढू शकते.
- अतिरिक्त साखर खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका वाढतो.
- जास्त साखरेचं सेवन केल्यानं चेहऱ्यावर मुरुम, त्वरीत वृद्धत्व आणि त्वचेच्या इतर समस्या देखील होतात.
- टाईप-2 मधुमेहाचा धोकाही वाढतो.
- साखर तुमची उर्जा पातळी देखील कमी करू शकते.