नागपूर :चीनमध्ये झपाट्यानं वाढणाऱ्या HMPV व्हायरसनं आता महाराष्ट्रात शिरकाव करणार असल्यानं चिंता वाढली आहे. गुजरात, तामिळनाडूनंतर आता नागपूरमध्येही HMPV व्हायरसचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. नागपूरमधील संशयित रुग्णांमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा समावेश असल्याचं सांगितलं जातय. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. यावर उपचारासाठी ते खासगी रुग्णालयात गेले होते. दोन्ही मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही मुलांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
संशयित मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार : संशयित मुलांचे नमुने हे नागपूर येथील एम्स आणि पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. येत्या तीन ते चार दिवसात अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर यावर माहिती देणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (ETV Bharat Reporter)
नागरिकांच्या मनात भीती: ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या व्हायरसची भीती सध्या जगभरात पसरली आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसचा उद्रेक झाला असल्यानं आता भारतात देखील एचएमपीव्ही व्हायरसचे संशयित रुग्ण मिळून येत असल्यानं लोकांमध्ये काही प्रमाणात भीती वाढली आहे. भारतात पुन्हा कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल का? असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे.
"संशयित रुग्णांच्या संदर्भात जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तोवर याबाबत बोलता येणार नाही. दोन्ही संशयित रुग्ण हे ठणठणीत असून त्यांना कुठलाही त्रास नाही. त्यामुळं नागपूरात एकही सक्रिय रुग्ण नाही". -डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी
सॅम्पलचे जीनोम सीक्वेंसिंग केली जाणार: नागपुरातीलसंशयित रुग्णांच्या सॅम्पलचं जीनोम सीक्वेंसिंग केलं जाणार आहे. तसाही हा जुना व्हायरस आहे. तर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर लहान मुले आणि ६५ वयापेक्षा अधिक वृद्धांची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र भीतीचं तसं काही कारण नाही अशी माहिती, नागपूर एम्सचे संचालक प्रशांत जोशी यांनी दिली.
एचएमपीव्ही म्हणजे काय? :एचएमपीव्ही हा एक श्वसन संसर्गजन्य आजार असून तो वरचा आणि खालचा श्वसन मार्ग प्रभावित करतो. हा प्रामुख्यानं लहान मुले, वयोवृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 90 टक्के लोकांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचे पुरावे सापडतात, तर 3 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या 90 टक्के बाळांमध्ये एचएमपीव्ही अँटीबॉडीज आढळतात.
काय आहेत लक्षणं? :एचएमपीव्हीमध्ये खोकला, सर्दी, ताप तसंच श्वसनास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात. हा संसर्ग श्वसनातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमुळं किंवा दूषित पृष्ठभागांच्या संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सौम्य फ्लूसारखा असून तो तीव्र स्वरूप देखील घेऊ शकतो. जसं की श्वास घेताना त्रास होणे, ऑक्सिजनची कमतरता, किंवा दमा वाढणे.
कशी काळजी घ्यावी?
- कमीत कमी 20 सेकंद साबणानं वारंवार हात धुवावे
- हात धुतल्याशिवाय हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये.
- संक्रमित लोकांपासून दूर राहावं.
- सर्दी-खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी मास्क वापरावे.
- खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक झाकावे.
- या विषाणूची लागण झालेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये.
हेही वाचा -
- देशात एचएमपीव्हीचे पाच रुग्ण, शास्त्रज्ञ स्वामीनाथन सौम्या यांनी दिला 'हा' सल्ला
- HMPV म्हणजे काय? चिंता करु नका, आरोग्य विभागाच्या 'या' सूचनांचं पालन करा
- एचएमपीव्ही विषाणू जुनाच असल्यानं घाबरू नये, दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर डॉक्टरांची पोस्ट चर्चेत