हैदराबाद Ashadhi Ekadashi Recipes : आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) यंदा 17 जुलैला आहे. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा दिवस म्हणून आषाढी एकादशी राज्यभर उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने संपूर्ण दिवस एकादशीचा उपवास घरातील सर्व लोक करतात.
1) वरीचा भात आणि आमटी -
- साहित्य :1 कप वरीचे तांदूळ, जिरे 2 टेबलस्पून, साजूक तूप 2 टेबलस्पून, 2 कप पाणी
- कृती : वरीचा भात बनवण्यासाठी एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे फोडणीला घालावेत. जिरे फुलल्यानंतर त्यात भिजवून घेतलेली वरी घालावी. त्यानंतर साजूक तुपामध्ये ही वरई चांगली खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावी. त्यानंतर त्यात गरम पाणी घालावे. आता या भांड्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफेवर भात शिजवून द्यावा आणि आपला वरीचा भात खाण्यासाठी तयार आहे.
शेंगदाण्याची आमटी -
- साहित्य :भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1/ 2 कप, आलं 1 लहान तुकडा, किसलेलं ओल खोबर 1 वाटी, हिरव्या मिरच्या 4, उकडवून घेतलेला 1 बटाटा, चवीनुसार मीठ, जिरे, लाल मिरची पावडर आणि पाणी.
- कृती : शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, किसलेलं ओल खोबर, आलं, हिरव्या मिरच्या आणि गरजेनुसार पाणी घालून त्याची मिक्सरमध्ये पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. आता एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे, उकडलेल्या बटाटा, लाल मिरची पावडर, मीठ घालून परतून घ्या. त्यानंतर यात मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले पेस्ट घालावी. आमटीला एक उकळी आली की, ती खाण्यासाठी तयार होते.
2) साबुदाणा डोसा-
- साहित्य : अर्धा कप साबुदाणा, अर्धा कप भगर, एक बटाटा, शेंगा कूट, पाव कप दही, हिरव्या मिरची पेस्ट 1 टीस्पून, जीरेपूड, चवीनुसार मीठ
- कृती :साबुदाणा 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर थोडा भाजून घ्या. साबुदाणा थंड झाला की, साबुदाणा आणि भगर एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. फिरवलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या. यानंतर बटाटा उकडून घ्या आणि मिक्सरमधून बटाट्याची पेस्ट करून घ्या. बटाट्याची पेस्ट साबुदाणा- भगरीच्या पिठात टाका. त्यात शेंगदाण्याचे कूट, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाका. गरजेनुसार पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि नंतर नेहमीप्रमाणे डोसे करा.