महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

2024मधील कमी बजेटमध्ये निर्मित झालेल्या 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रोवला होता यशाचा झेंडा... - YEAR ENDER 2024

कमी बजेटमध्ये निर्मित झालेले 2024मधील हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील चित्रपट, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती.आता याबद्दल जाणून घेऊया...

Low budget films
कमी बजेटमधील चित्रपट (movies poster -instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 6 hours ago

मुंबई : मनोरंजनाच्या जगात दरवर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत असतात. अनेकदा असे काही होते की, जे कमी बजेट निर्मित असलेले चित्रपट प्रेक्षकांचं मनं जिंकून घेते. यावर्षी देखील असेच काही चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले, ज्यांनी प्रचंड कमाई केली. कमी बजेट असताना देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. यामध्ये बॉलिवूड ते साऊथ चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. चला तर मग आज आपण याबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलं होत.

'लापता लेडीज' : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र,'लापता लेडीज' प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला. मात्र हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित झाला होता, तेव्हा त्यानं खळबळ उडवून दिली होती. नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाल्यानंतर या चित्रपटाचं भरपूर कौतुक करण्यात आलं होतं. 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची निवड ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत झाली होती. मात्र आता हा चित्रपट ऑस्कर रेसमधून बाहेर पडला आहे. 'लापता लेडीज'नं जगभरात 27.66 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर 13.8 दशलक्ष यूजर्सनं पाहिलं आहे.

'हनु-मॅन' : 'हनु-मॅन' हा प्रशांत वर्मा दिग्दर्शित तेलुगू सुपरहिरो चित्रपट असून तेजा सज्जानं यात मुख्य भूमिका साकारली आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 350 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. या चित्रपटात वरलक्ष्मी सरथकुमार, अमृता अय्यर आणि विनय राय यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.

'शैतान' :अभिनेता अजय देवगणचा 'शैतान' हा चित्रपट कमी बजेटच्या चित्रपटांपैकी एक आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ब्लॅक मॅजिकवर आधारित आहे. 'शैतान'नं जगभरात 211.06 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. या चित्रपटात आर. माधवन, खलनायकाच्या भूमिकेत आहे.

'मुंज्या' :आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा चित्रपट एका लोककथेवर आधारित आहे. 'मुंज्या' म्हणजे कोकणात प्रचलित असलेला जनेऊ संस्कार आहे. अभय वर्मानं 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'मुंज्या' या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत शर्वरी वाघही दिसली. 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जगभरात 132.13 कोटींची कमाई करून विक्रम केला.

'मंजुम्मेल बॉयज' : चिदंबरम एस. पोदुवाल दिग्दर्शित 'मंजुम्मेल बॉईज' मल्याळम चित्रपट आहे. हा चित्रपट 2006 मध्ये तामिळनाडूमधील कोडाइकनाल येथे घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'मंजुम्मेल बॉईज'नं जगभरात 242 कोटींहून अधिक व्यवसाय केला. हा चित्रपट आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला. 'मंजुम्मल बॉईज' चित्रपटात सोबिन शाहीर, बाळू वर्गीस आणि श्रीनाथ भासी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'आवेशम' :'आवेशम' चित्रपट हा एक मल्याळम चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. जीतू माधवन दिग्दर्शित ॲक्शन कॉमेडी चित्रपट 30 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला. या चित्रपटानं भारतात 25.10 कोटींची कमाई केली. याशिवाय जगभरात यानं 155.95 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. 'आवेशम' चित्रपटात फहद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट बेंगळुरूमधील शाळांमधील गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वास्तविक घटनेवर आधारित आहे.

'महाराजा' : साउथ स्टार विजय सेतुपतीचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'महाराजा' देखील प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. हा तमिळ चित्रपट तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित झाला होता. निथिलन समीनाथन दिग्दर्शित या चित्रपटानं 20 कोटी रुपये खर्चून 186.85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या चित्रपटात अनुराग कश्यप, सचना नमिदास, ममता मोहनदास, अभिरामी आणि सिंगमपुली यांच्याही भूमिका आहेत.

'आर्टिकल 370' :यामी गौतम स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'आर्टिकल 370' यावर्षी खूप चर्चेत होता. आदित्य धर निर्मित हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार केला गेला. 'आर्टिकल 370' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटानं जगभरात 110.57 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

'स्त्री 2' : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' चित्रपट कमी बजेट आणि जास्त कमाई करणाऱ्या, चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. अमर कौशिकनं 60 कोटी रुपये खर्च करून या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच, यानं अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटानं जगभरात 880 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. 'स्त्री 2' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details