मुंबई - 'रयतेचे राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आजवर अनेक साहित्यकृती आणि कलाकृतींमधून सामोरं आलं. चित्रपटांपुरतंच बोलायचं झालं तर 'चित्रतपस्वी' भालजी पेंढारकर यांनी आपल्या ऐतिहासिक चित्रपटांमधून पार चाळीसच्या दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज मराठीजनांपर्यंत पोहोचवले. भालजी पेंढारकरांनी बनवलेल्या अनेक ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम स्वरुपी कोरली गेली आहे. १९४३ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बहिर्जी नाईक' या चित्रपटात सुर्यकांत मांढरे यांनी तरुण शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर अनेक ऐतिहासिक चित्रपटातून सुर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत मांढरे दोघंही छत्रपती शिवाजी महाराज अक्षरशः जगले. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ अशा कितीतरी चित्रपटांची यादी देता येईल. त्यानंतर आतापर्यंत मराठी सिनेमा आणि मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन अनेकदा झालंय. यापूर्वी रवींद्र महाजनी, श्रीराम गोजमगुंडे, महेश मांजरेकर यासारख्या अभिनेत्यांनीही या भूमिकेला मोठ्या पडद्यावर न्याय देण्याचा प्रयत्न केला. अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, शंतनू मोघे यांनीही छोट्या तसंच मोठ्या पडद्यावर शिवरायांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटात शरद केळकरनं शिवाजी महाराज निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 'कंतारा' या कन्नड चित्रपटाचा लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टीही 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटामार्फत महाराजांची महाशौर्यगाथा 'पॅन इंडिया' प्रेक्षकांपर्यत नेण्याचा पण केला आहे. महेश मांजरेकरने 'वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर 'राजा शिवाजी' या चित्रपटासाठी रितेश देशमुख महाराजांची व्यक्तिरेखा जगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटांची घोषणा झाली. पण त्यापुढे काय झालं? हा सर्वसामान्य चित्रपटप्रेमींना पडलेला प्रश्न आहे.
रितेश-अजय अतुल-नागराज मंजुळेंच्या शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचं काय झालं? :
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं पर्व रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे ही मराठी चित्रपटसृष्टील महान त्रयी एकत्र आली आणि त्यांनी 2020 मध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांची 'महागाथा' निर्माण करण्याचा संकल्प केला. रितेश देशमुख यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमात पोस्ट करून आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या व्हिडिओमध्ये एक वही पहिल्यांदा दिसते. त्यावर - रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे अभिमानाने सादर करीत आहेत..शिवाजी...राजा शिवाजी...छत्रपती शिवाजी ...महागाथा ही अक्षरं उमटतात.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील या चित्रपटाचे तीन भाग या महागाथेतून सादर करण्याचा प्रस्ताव होता. याध्ये पहिला भाग - शिवाजी, दुसरा भाग - राजा शिवाजी, आणि तिसरा भाग - छत्रपती शिवाजी अशी शीर्षकं ठरवण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या या महागाथेचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची अपेक्षाही उंचावल्या होत्या. स्वतः नागराजनंही सोशल मीडियावर या गोष्टीला दुजोरा दिला होता. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा होती. मात्र 2025 उजाडूनही हा चित्रपटाचं पुढे काय झालं, याबाबत कुठेही वाच्यता होत नाहीय.
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी'चं पुढं काय झालं? :दरम्यान, 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं रितेश देशमुखनं नवीन प्रोजेक्टची घोषणा केली होती, हे खरं आहे. या चित्रपटाचं शीर्षक 'राजा शिवाजी' असं ठरवण्यात आलं. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी स्वीकारली होती.