मुंबई - Welcome 3 :'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामधून संजय दत्तनं माघार घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही. 'वेलकम 3' चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या 'वेलकम टू द जंगल' विनोदी चित्रपटावर काम वेगाने सुरू आहे. या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू असून दोन शेड्यूल पूर्ण झाले आहेत. दरम्यान या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'वेलकम 3' चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी मुंबईमधील शेड्यूलमध्ये 200 घोड्यांबरोबर एक ॲक्शन सीन शूट केला आहे. या ॲक्शन सीनमध्ये सर्व स्टार्स देखील उपस्थित आहेत.
गाण्यात असणार 500 डान्सर : याशिवाय त्यांनी एक गाणं देखील शूट केलं आहे. यामध्ये 500 डान्सर असल्याचं सांगण्यात येत आहे. हे डान्सर या चित्रपटामधील स्टार कास्टच्या मागे आहेत. 'वेलकम 3' चित्रपटाची निर्मिती फिरोज नाडियादवाला करत आहे. हा चित्रपट ॲक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. 'वेलकम टू द जंगल'मध्ये 25 हून अधिक कलाकार दिसणार आहेत. नुकतेच आफताब शिवदासानीनं देखील या चित्रपटात प्रवेश केला आहे. 'वेलकम टू द जंगल' ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा विचार या चित्रपटाचे निर्माते करत आहेत. त्यामुळेच या चित्रपटावर वेगानं काम सुरू आहे.