मुंबई - Shah Rukh Khan in Spain :कोलकाता नाइट रायडर्सनं (केकेआर) इंडियन प्रीमियर लीग २०२४ ट्रॉफी जिंकल्यानंतर शाहरुख खानच्या आनंदाला भरती आली होती. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' यांसारख्या हिट चित्रपटांनी त्याला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठीत बनवल्यानंतर त्याच्या आयपील टीमनंही यंदाच्या हंगामात नेत्रदीपक कामगिरी केली. हे सगळं सुरू असतानाच तो आपल्या भविष्यातील प्रोजेक्ट्सवरही बारीक लक्ष ठेवून आहे. तो त्याची मुलगी सुहाना खानबरोबर नव्या चित्रपटाची तयारी करत आहे.
किंग खानचे तमाम चाहते शाहरुख खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा करत आहेत, चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, त्यानं सुजॉय घोष दिग्दर्शित 'किंग' या चित्रपटाकडे आपले लक्ष वळवलं आहे. चित्रपटाच्या सेटवरील सुहानाबरोबरचा त्याचा फोटो ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आलं. हा सेट स्पेनमध्ये असल्याचं आणि शाहरुख मुलीबरोबर या सुंदर देशात शूटिंग करत असल्याची त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
आठवड्याच्या शेवटी X या सोशल मीडियावर एका युजरनं शाहरुखचा एक फोटो शेअर केला. हा फोटो 'किंग'च्या सेटवरील असल्याचा दावा त्यानं केला होता. शाहरुख सध्या स्पेनमध्ये शूटिंग करत असल्याचं हा युजर सूचवत होता. निळ्या रंगाचा सूट घातलेला शाहरुख खान काही लोकांशी बोलताना दिसत असून त्याच्या मागे निळसर पाणी आणि भव्य पर्वत अशी पार्श्वभूमी असल्याचं दिसत आहे.