मुंबई : चित्रपटांमधून राजकारणात प्रवेश केलेल्या तमिळ सुपरस्टार 'थलापथी' विजयच्या शेवटच्या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, चाहते शीर्षक आणि विजयच्या चित्रपटातील फर्स्ट लूकसह प्रत्येक अपडेटची वाट पाहत आहेत. विजयचा शेवटचा चित्रपट 'थलापती 69' आहे. आज 26 जानेवारी रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि विजयचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. केव्हीएन प्रॉडक्शननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर आता त्याचे चाहते खुश झाले आहेत. यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
'थलापती 69'चे शीर्षक जाहीर :साऊथ स्टार विजयचा शेवटच्या चित्रपटाचे नाव 'जन नायगन' आहे. हा चित्रपट राजकारणाशी संबंधित आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं 'आपण त्यांना 'जन नायगन' म्हणू शकतो, 'थलापती 69'चा फर्स्ट लूक.' या चित्रपटानंतर विजय चित्रपटसृष्टीला निरोप देईल आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल. विजयच्या राजकीय पक्षाचं नाव तमिलगा वैत्री कझगम आहे. तसेच चित्रपटसृष्टी सोडण्याच्या बातमीवर विजयनं त्याच्या पहिल्या राजकीय सभेत म्हटलं होतं, "मी माझे हिट करिअर आणि मोठा पगार सोडून तुमच्याकडे आलो आहे, मी लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे."