मुंबई- ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात वाडकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करत पुरस्काराने सन्मान केला.
सुरेश वाडकर यांना 2021 मध्ये पद्मश्री या भारतीय प्रजासत्ताकातील चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. "नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद जी यांच्या कार्यकाळात हा पुरस्कार मिळणे खरोखरच विशेष आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप आनंदी आहे. हा पुरस्कार मिळण्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि आता मला शेवटी ते मिळाले आहे,” असे त्यावेळी वाडकर यांनी एएनआयला सांगितले होते.
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हे त्यांच्या हिंदी आणि मराठीतील पार्श्वगायनासाठी ओळखले जातात. गेल्या ४५ वर्षांपासून ते आपल्या आवाजाची प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. भक्तिसंगीतातही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. 'सपने में मिलती है', 'पहली बार मोहब्बत की है' आणि 'लागी आज सावन की' हे त्यांचे काही लोकप्रिय ट्रॅक आहेत.