मुंबई - साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम्स' (GOAT) या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अलिकडेच या चित्रपटातील 'व्हिसल पोडू' हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः विजयनं गायलं आहे. युवन शंकर राजा यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला यूट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढत चालली आहे. प्रेक्षक आता या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याची आणि टिझर आणि ट्रेलरची प्रतीक्षा करत आहे.
आज सकाळी, दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला आणि 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम्स' (GOAT) चित्रपटातील दुसरं गाणं जूनमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं. या घोषणेमुळे विजयच्या निष्ठावंत चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर #TheGreatestOfAllTime हा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे.
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम्स' चित्रपटाच्या टिझर रिलीझ योजनेबद्दल विचारले असता, वेंकटने असे तपशील उघड करणे खूप घाईचं होईल, असं सांगितलं. या चित्रपटात थलपथी विजय आणि व्यंकट प्रभू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. विजय या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात वडील आणि मुलाचे नातं दाखवलं जाणार असल्याचं सांगण्यात येतं.