मुंबई - National Siblings Day: राष्ट्रीय भावंड दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी अनेक सेलेब्रिटी आपल्या भावंडाबरोबरचा फोटो शेअर करुन आपल्या नात्याबद्दलचा काही खुलासे करत असतात. या प्रसंगी, बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने त्याचा भाऊ, चित्रपट निर्माता रोहित धवन याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्यावर असलेला भावाचा विश्वास त्याच्या यशामध्ये निर्णायक ठरला आहे. आज त्यानं जो पल्ला गाठला आहे तो भावाच्या विश्वासामुळेच यावर त्याचा ठाम विश्वास आहे.
अभिनेत्री तापसी पन्नूनंही यंदाच्या राष्ट्रीय भावंड दिनी आपली बहिण शगुन बरोबर असलेल्या नात्याबद्दल शेअर केलं आहे. वरुण धवन आणि तापसी पन्नूनं आपल्या भावंडाबद्दल त्यांच्या आवडीनिवडी, नापसंती आणि जीवनातील छोटे बारकावे अशा विविध पैलूंवर स्पष्ट भाष्य केलं आहे.
इंस्टाग्रामवर वरुण धवनने त्याचा भाऊ रोहित बरोबरचे दोन फोटो अपलोड केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले आहे की, "माझ्या आयुष्यात माझ्या भावाशिवाय मी कोणीच नाही. माझ्यावर विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती माझा भाऊ होता." वरुण धवनचा भाऊ रोहितने 2016 मध्ये ढीशूम हा कॉमेडी अॅक्शन चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात वरुण आणि रोहितने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. यामध्ये जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडीज, अक्षय खन्ना आणि साकिब सलीम यांनीही भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात परिणीती चोप्रा, अक्षय कुमार आणि नर्गिस फाखरी यांनीही कॅमिओ भूमिका केल्या होत्या.
दरम्यान, तापसी पन्नूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिच्या बहिणीमधील हलके-फुलके संभाषण आहे. व्हिडिओ शेअर करताना, तापसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अधिकच ज्ञान पाजळलं तर आपण काय गमावतो हे दाखवणारं हे संभाषण आहे. आमच्या लीव्हिंग रुममधील गप्पांच्या मालिकेचा हा तिसरा भाग 'शगुन म्हणते म्हणून' आहे. हॅप्पी सिबलिंग डे."
कामाच्या आघाडीवर, तापसी पन्नू आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'खेल खेल में' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मुदस्सर अझीझ दिग्दर्शित, खेल खेल में चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, एमी विर्क, फरदीन खान, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्यासह अनेक कलाकार आहेत. दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकत्र येणा-या मित्रांच्या समूहाभोवती हा चित्रपट केंद्रित आहे.