मुंबई - Google Aa Trailer : सध्या मनुष्याच्या आयुष्यात टेक्नॉलॉजीचा प्रभाव वाढत चालला आहे. सर्च मशीन गूगलचे महत्व सर्वांनाच परिचित आहे. या सर्वांचा परिणाम सिनेमावरदेखील झालेला दिसतो. आगामी मराठी चित्रपट 'गूगल आई' या नावावरून त्याचा प्रत्यय येईल. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा 'गूगल आई'चा थरारक आणि विविध भावना उलगडणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'गूगल आई'च्या रहस्यांची उकल कशी व कधी होईल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'गूगल आई' चित्रपटाच्या रोमांचक आणि मनोवेधक ट्रेलरला नेटिझन्स चांगला प्रतिसाद देत आहेत.
डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी यांच्या प्रस्तुत 'गूगल आई' या चित्रपटाचे निर्माते डॉलर दिवाकर रेड्डी आहेत. गोविंद वराह यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. एस सागर यांनी संगीत दिले आहे. यात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका हसत्या खेळत्या आनंदी कुटुंबावर अचानक एक मोठे संकट येते. या संकटामुळे त्या कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातून ते कसे बाहेर पडतात आणि त्यासाठी त्यांना 'गूगल आई'ची कशी मदत होते हे चित्रपटातून समोर येईल.