मुंबई- Shauna Gautam directorial debu : झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री खुशी कपूर आता नव्या चित्रपटात अभिनय साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. शौना गौतम दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या एका नवीन चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शनिवारी, दिग्दर्शिकेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्याचे जाहीर केलं आहे.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये शौना गौतमने खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांच्यासह संपूर्ण कलाकार आणि 'क्रू' बरोबरचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शन तिन लिहिलंय, "माझ्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग संपलं....व्वाह. मी फक्त आभार मानू इच्छिते." खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका केकचा फोटो शेअर केला शेअर केला आहे, ज्यावर तिनं "इट्स अ रॅप" असे लिहिले आहे.
आगामी रोमँटिक कॉमेडीची निर्मिती करण जोहर करत आहे आणि त्याच्या कथा सांगण्याच्या स्टाईलमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता थेट ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे. असंही सांगितलं जातंय, की सुनील शेट्टी कलाकारांमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत सामील झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये भर पडली आहे.