मुंबई - साऊथ सुपरस्टार धनुष आणि नागार्जुन यांच्या बहुप्रतीक्षित कुबेर चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आली आहे. यात रश्मिका मंदान्ना आणि जिम सरभ देखील दिसणार आहेत. कुबेरमध्ये धनुष, रश्मिका मंदान्ना, नागार्जुन अक्किनेनी आणि जिम सर्भ या कलाकारांचा समावेश आहे. X वर झलक शेअर करताना महेश बाबूने लिहिलंय, 'अॅक्शन, ड्रामा आणि सिनेमॅटोग्राफीने परिपूर्ण, सर्वांना शुभेच्छा.'
धनुष आणि नागार्जुनच्या 'कुबेर' चित्रपटाची पहिली झलक, रश्मिका मंदान्नाचा हटके लूक - THE FIRST GLIMPSE OF KUBER
धनुष आणि नागार्जुन स्टारर कुबेर चित्रपटाची पहिली झलक शेअर झाली आहे. या दोन दिग्गज अभिनेत्यांसह जीम सरभ आणि रश्मिका मंदान्नाचीही भूमिका यात आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Nov 15, 2024, 8:10 PM IST
शेखर कममुला दिग्दर्शित 'कुबेर' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 31 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी निर्मात्यांनी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरमध्ये धनुष आणि नागार्जुन अक्किनेनी वेगवेगळ्या अवतारात दिसले होते. यात दोघांच्याही चेहऱ्यावर गांभीर्य आणि निर्भयता दिसून येत होती. त्यामुळं त्यांची प्रत्यक्ष पात्र कशी आहेत याची उत्सुकता लागून राहिली होती.
मुंबईच्या किनाऱ्यालगत असलेल्या झोपडपट्टी आणि उंच टॉवरच्या पार्श्वभूमीवर 'कुबेर'ची झलक सुरू होते. मोठ्या पाईपलाईन वरुन जाणारा एक व्यक्ती दिसतो. हा एक गरीबीनं गांजलेला तरुण धनुष असल्याचं आपण पाहतो. तर समुद्र किनाऱ्यावर निवांत फिरणारा, पत्नी आणि मुलीच्या बरोबर बुद्धीबळ खेळणारा नागार्जुन दिसतो. तर स्वतःच्या विमानातून उतरणारा, मागे पुढं सुरक्षा रक्षक असलेला जीम सरभचीही झलक दिसून येते. मध्यमवर्गीय मुलीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना आपल्याला चकित करुन जाते. या पात्रावरुन कथानकाचा अंदाज करणे कठीण असलं तरी हे दिग्गज कलाकार एका सकस कथानक असलेल्या चित्रपटात काम करत असल्याची खात्री या झलकमधून दिसून येत आहे.