मुंबई - Tamannaah Bhatia lesson : अभिनेत्री तमन्ना भाटिया भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हिंदीसह साऊथ इंडियन भाषेमध्ये अनेक चित्रपट केले असून ती तिच्या बोल्ड सीन्ससाठीही प्रसिद्ध आहे. तमन्ना तिच्या मागील प्रोजेक्ट लस्ट स्टोरीजमध्ये खूप इंटिमेट सीन देताना दिसली होती. आता तमन्ना एका विचित्र गोष्टीमुळे प्रकाशझोतात आली आहे. बेंगळुरूमधील एका शाळेत तिच्यावरील एक धडा शिकवला जात होता. यामध्ये तिच्याबद्दलची माहिती देण्यात आली होती.
हे प्रकरण बेंगळुरूमधील हेब्बल येथील सिंधी हायस्कूलमधील आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक हे सर्व पाहून संतापले आहेत. या प्रकरणामुळे पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार पालकांना या गोष्टीची माहिती कळाली आणि त्यांनी शाळेत गोंधळ घातला.
मिळालेल्या बातमीनुसार तमन्ना भाटियाचा धडा 7 व्या वर्गात शिकवला जात होता. वर्ग 7 च्या पुस्तकातील धड्याचं शीर्षक होतं "विभाजनानंतरचे जीवन: सिंधमधील स्थलांतर, समुदाय आणि संघर्ष." या धड्याचा विषय 1947 ते 1962 या कालावधीशी संबंधित आहे. या प्रकरणात, अभिनेत्रीबद्दल माहिती दिली जात होती. यामध्ये अभिनेत्रीच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला जात होता.