मुंबई - SS Rajamouli : चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली जपान दौऱ्यामुळे चर्चेत आहे. राजामौली हे आपल्या कुटुंबासह 'आरआरआर'च्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला गेले होते. राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट जपानमध्ये सुरू आहे. या चित्रपटाची तेथील लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. जेव्हा एसएस राजामौली तेथे आरआरआरच्या स्क्रीनिंगदरम्यान हजर होते, तेव्हा तिथे अनेक लोक जमले होते. राजामौली यांनी सर्व चाहत्यांची भेट घेतली. याच दरम्यान, 21 मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय जपानच्या भूकंपातून थोडक्यात बचावले आहेत. यानंतर तिथे गोंधळ उडाला.
जपानमध्ये झाला भूकंप : या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 मोजली गेली आहे. आता सोशल मीडियावर कार्तिकेयनं भूकंपाचा भीतीदायक अनुभव शेअर केला आहे. राजामौली यांच्या मुलानं त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची स्मार्टवॉच भूकंपाचा इशारा दाखवताना दिसत आहे. यानंतर काही वेळातच 5.3 तीव्रतेचा भूकंप झाला. कार्तिकेयनं त्याच्या या पोस्टवर लिहिलं, ''आत्ताच जपानमध्ये भूकंप झाला, मी 28व्या मजल्यावर होतो आणि हळूहळू जमीन हादरायला लागली, भूकंप झाल्याचे समजायला आम्हाला थोडा वेळ लागला, मी घाबरले होतो.'' या भूकंपामध्ये 'आरआरआर' टीम सुरक्षित आहे.