मुंबई - अनिल शर्मा दिग्दर्शित 'वनवास' चित्रपटासाठी नाना पाटेकर सज्ज झाला आहे. उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून या रंजक कथानकाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या प्रदर्शनापूर्वी स्पेशल स्क्रिनिंग करण्याचं ठरवलंय, त्यामुळे उत्साहात भर पडली आहे. हे स्क्रिनिंग मुंबईत होणार असून, त्यासाठी आमिरलाही आमंत्रित करण्यात आलं आहे.
चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीनं सांगितलं की, "नाना आणि आमिर खान यांच्यात खूप चांगलं बाँडिंग आहे. वनवासच्या टीमनं आमिरसाठी मुंबईत स्पेशल स्क्रिनिंगची व्यवस्था केली आहे. आमिर 20 डिसेंबरला हा चित्रपट पाहणार आहे."
'वनवास' ही एक भावनिक कथा आहे जी कुटुंब, आदर आणि आत्म-स्वीकृतीचा मार्ग दाखवते. यामध्ये आई-वडिलांना वनवासात पाठवणाऱ्या मुलांची वेदना दाखवण्यात आली आहे. ही कथा आजच्या प्रेक्षकांशी खोलवर जोडलेली आहे.