मुंबई - Usha Uthup Husband No More : पॉप आयकॉन उषा उत्थुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या सोमवारी 8 जुलै रोजी त्यांचे पती जानी चाको उत्थुप(78) यांचं कोलकातामध्ये निधन झालं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जानी यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं केलं. रिपोर्ट्सनुसार, जानी चाको उत्थुप आपल्या घरी टीव्ही पाहात होते. त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. आज मंगळवारी म्हणजेच 9 जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं समजत आहे.
उषा उत्थुपच्या पतीचं निधन : उषा उत्थुप आणि त्यांच्या कुटुंबीयांना जवळचे लोक शोकसंवेदना पाठवत आहेत. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना अनेकजण करत आहेत. जानी हे उषा यांचे दुसरे पती होते. त्यांचा चहाचा मळा होता. जानी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, उषा उत्थुप यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. उषा उत्थुपला हा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले होते. उषा उत्थुपचे पहिले लग्न दिवंगत रामू यांच्याबरोबर झाले होते. यानंतर त्यांनी जानी चाको उत्थुपबरोबर दुसरे लग्न केले.