मुंबई -TBMAUJ : अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर रोमँटिक चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' व्हॅलेंटाईन वीकमध्ये 9 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'च्या निर्मात्यांनी रसिकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चे निर्माते आता एका चित्रपटाच्या तिकिटासह एक तिकीट पूर्णपणे मोफत देणार आहेत.
व्हॅलेंटाईन वीकमधील स्पेशल ऑफर : या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही जोडीदाराबरोबर रोमँटिक चित्रपटचा आनंद घेऊ शकता. मडोक फिल्म्सनं 12 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स वीकमधील 'हग डे'च्या दिवशी रसिकांसाठी एक मोठी ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ''टू हार्ट्स, वन टिकट, बाय वन गेट वन टिकट, डील फॉर यू अँन्ड युअर व्हॅलेंटाईन.'' या पोस्टमध्ये निर्मात्यांनी असंही सांगितलं की, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, म्हणजेच 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर एकाच तिकिटावर हा चित्रपट पाहू शकता.