मुंबई : बी-टाऊनचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आज, 25 फेब्रुवारी रोजी आपला 44वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सुमारे 20 ते 21 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचा अभिनय अनेकांना आवडतो. शाहिदनं अनेक प्रकारचे पात्र रुपेरी पडद्यावर साकारले आहेत. प्रत्येक भूमिकेत त्यानं एक वेगळी छाप बॉक्स ऑफिसवर सोडली आहे. शाहिद हा इंडस्ट्रीत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होता. त्याचं नशीब 2003मध्ये चमकले. त्याला 'इश्क विश्क' चित्रपटामध्ये काम मिळालं. या चित्रपटाच्या माध्यामातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज शाहिदच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला, त्याच्या अशा काही चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे खूप विशेष आहेत.
'जब वी मेट' :2007मध्ये, शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरबरोबर इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या रोमँटिक चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात शाहिदनं एका प्रौढ व्यक्तीची भूमिका साकारली होती, जो त्याच्या आयुष्यातील एका वाईट टप्प्याशी झुंजत असतो. या चित्रपटात शाहिद कपूरच्या कूल लूक, निरागसता आणि त्याच्या व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. हा चित्रपट अजूनही लोकांना खूप आवडतो.
'कमीने' : 2009 मध्ये, 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त, विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'कमीने' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. मुंबईच्या अंडरवर्ल्ड पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात शाहिद कपूर दुहेरी भूमिकेत होता. या चित्रपटात 'चार्ली' आणि 'गुड्डू' या दोन वेगवेगळ्या जुळ्या मुलांची कहाणी दाखवण्यात आली होती. 'चार्ली' आणि 'गुड्डू' ही दोन्ही पात्रे शाहिद कपूरनं साकारून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दोन्ही पात्रे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होती.'चार्ली', एक लबाड आणि बदमाश आहे, जो फसवणूक करून मोठे होण्याचे स्वप्न पाहतो. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे. शाहिदनं या चित्रपटामध्ये खूप जबरदस्त अभिनय केला आहे.
'हैदर' :2014मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'हैदर' हा चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला होता. 'हैदर' चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात शाहिद कपूरनं हैदरची भूमिका केली होती. 'हैदर' ही एका माणसाची कहाणी आहे, जो त्याच्या कुटुंबामुळे अनेक समस्यांशी झुंजतो. या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी शाहिदनं अनेक पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटामधील त्याची भूमिका, त्याच्या पडद्यावरील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे. 'हैदर' चित्रपटात श्रद्धा कपूर, तब्बू, इरफान खान अशा अनेक कलाकारांनी काम केलं आहे.