मुंबई - Dil Se Shoot :बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. दरवर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटसृष्टीत दाखल होतात आणि त्यापैकी काहींनाच स्टारडम मिळते. चित्रपटांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. एखाद्या अभिनेत्याला त्याच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला निर्माता-दिग्दर्शकांच्या हाताखाली एखाद्या नोकरसारखे काम करावे लागते. परंतु जेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात येतो, यानंतर तो स्वतःच्या इच्छेनुसार काम करू लागतो. आता दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानंसुद्धा बॉलिवूडच्या एका सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
तिग्मांशू धुलियानं केला 'किंग खान'बद्दल खुलासा : तिग्मांशू धुलियानं एका मुलाखतीत सांगितलं की, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता चित्रपटाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे बसच्या फ्लोरवर झोपून दिवस काढत होता. तिग्मांशू धुलियानं शाहरुख खानबरोबर 'दिल से' चित्रपटात काम केलंय. त्यांनी एका मुलाखतीत खुलासा करत म्हटलं की, "शाहरुख खानबरोबर मी 'दिल से' चित्रपटात काम केलं होतं. त्याची वागणूक अत्यंत नम्र आहे. शाहरुख 'दिल से' चित्रपटाची निर्मिती होण्यापूर्वी स्टार झाला होता. 'दिल से'चं शूटिंग लडाखमध्ये सुरू होतं आणि तेथे व्हॅनिटी व्हॅन नव्हती. त्यावेळी शाहरुख खान बसच्या फ्लोरवर झोपायचा आणि लंच ब्रेकमध्ये आराम करायचा, तो कोणालाही त्याच्या जवळ येण्यास मनाई करत नव्हता. आम्ही लडाखमध्ये शूटिंग करत होतो, मणि सरांना प्रवासादरम्यान कुठलंही ठिकाण आवडलं तर, तिथे आम्ही शूटिंग करत होतो. शाहरुख जेवणानंतर 30 मिनिटे आराम करत होता."